जत तालुक्यात ३० हजार हेक्टरवर पेरणी
By admin | Published: July 17, 2017 12:20 AM2017-07-17T00:20:49+5:302017-07-17T00:20:49+5:30
जत तालुक्यात ३० हजार हेक्टरवर पेरणी
गजानन पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
संख : खरीप हंगामातील पिकांसाठी यंदा कायम दुष्काळी जत तालुक्यात पावसाने समाधानकारक हजेरी लावली आहे. गेल्या ५ वर्षामध्ये प्रथमच मृग, आर्द्रा पुनर्वसू नक्षत्रात पर्जन्यराजाने भलतीच कृपा केली आहे. आतापर्यंत २०९.९ मिलिमीटर पाऊस पडला आहे.
तालुक्यात खरिपाची ३० हजार १४७ हेक्टरवर पेरणी झाली आहे. सध्या कोळपणीची कामे सुरू आहेत. अनुकूल हवामान, पुरेशी ओल यामुळे पिकांची उगवण चांगली झाली आहे. मात्र तालुक्याच्या काही भागामध्ये पावसाने पाठ फिरविल्याने खरीप हंगामातील पिके सुकू लागली आहेत. पिकांची वाढ खुंटणार आहे. दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शेती हंगामातील खरीप हंगाम हा प्रमुख हंगाम आहे. खरीप हंगामातील बाजरी पीक प्रमुख पीक आहे. तालुक्यामध्ये खरीप हंगाम क्षेत्र ६२ हजार २०० हेक्टर क्षेत्रात पिके घेतली जातात. बाजरी पीक ३२ हजार ९६० हेक्टर क्षेत्रात घेतले जाते. मका ४ हजार ६२५ हेक्टर, मूग १२२५ हेक्टर, उडीद १४२० हेक्टर, सूर्यफूल १२८५ हेक्टर क्षेत्रावर घेतले जाते.
मात्र तालुक्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाने ८ जूनपासून चांगली हजेरी लावली होती. माडग्याळ, सोन्याळ, व्हसपेठ, सिद्धनाथ परिसराचा अपवाद वगळता अन्य ठिकाणी पावसाने चांगली हजेरी लावली आहे. मृग, आर्द्रा, पुनर्वसू या नक्षत्रामध्ये चांगला पाऊस पडला. जमिनीमध्ये पुरेशी ओल झाल्याने शेतकऱ्यांनी झटपट पेरणी केली. ५ वर्षांमध्ये प्रथमच खरिपाच्या ३० हजार १४७ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. जवळपास ४८ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. मात्र त्यानंतर पुन्हा पावसाने पाठ फिरवली होती. दुबार पेरणीचे संकट उभे राहिले होते. पिके उन्हं धरू लागली होती. वाढ खुंटली होती.
दडी दिलेल्या पावसाने ९ जुलैला देवनाळ, मेंढीगिरी, मुचंडी, दरीबडची, सिद्धनाथ परिसरामध्ये चांगली हजेरी लावली. खरीप हंगामातील पिकांना जीवदान मिळाले आहे. सध्या पुनर्वसू नक्षत्र आहे. त्याचे वाहन कोल्हा आहे. १९ जुलैपासून पुष्य (म्हातारा पाऊस) नक्षत्र सुरू होणार आहे. त्याचे वाहन उंदीर आहे. ही दोन्ही नक्षत्रे पावसास अनुकूल असल्याचे सांगितले जात आहे. सध्या मात्र पावसाने चांगलीच ओढ दिल्याने तालुक्यातील शेतकरी चिंतेत असून दुबार पेरणीच्या संकटामुळे हवालदिल झाल्याचे दिसून येत आहे.
ओढे, तलाव कोरडेच; टॅँकरही सुरू..!
खरीप हंगामासाठी पाऊस समाधानकारक झाला आहे. पण कोणत्याही ओढ्याला पाणी आले नाही. तलावांनाही पुरेशा प्रमाणात पाणी आलेले नाही. पूर्व भागातील तलाव कोरडे ठणठणीत पडलेले आहेत. ऐन पावसाळ्यातही ६८ गावांना, ५७९ वाड्या-वस्त्यांना ७३ टॅँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. १ लाख ५५ हजार ९१८ एवढी लोकसंख्या पिण्याच्या पाण्यासाठी टॅँकरवर अवलंबून आहे. त्यामुळे तालुका आजही मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे.
पीक पेरणी अहवाल (हेक्टरमध्ये)
पीक क्षेत्र
बाजरी२०४२०
उडीद४२००
हुलगा१०२
मका१६४०
तूर१५८०
भुईमूग४७०
मूग९१०
मटकी६८०
सूर्यफूल१४५