सांगली जिल्ह्यात पावसाअभावी पावणेदोन लाख हेक्टर क्षेत्र पेरणीविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2018 11:25 PM2018-07-01T23:25:43+5:302018-07-01T23:25:49+5:30

Sowing of Pavnadon Lakh Hector area due to lack of rain in Sangli district | सांगली जिल्ह्यात पावसाअभावी पावणेदोन लाख हेक्टर क्षेत्र पेरणीविना

सांगली जिल्ह्यात पावसाअभावी पावणेदोन लाख हेक्टर क्षेत्र पेरणीविना

Next


सांगली : जूनच्या सुरुवातीस दणक्यात प्रारंभ करणाऱ्या पावसामध्ये अद्यापही खंड सुरुच आहे. शासकीय दफ्तरी मात्र जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी १३३.४ मिलिमीटर पाऊस झाला आहे. प्रत्यक्षात पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या असून बळीराजा चिंतेत आहे.
जिल्ह्यात अद्याप सुमारे दोन लाख हेक्टर क्षेत्र पेरणीच्या प्रतीक्षेत आहे. पेरणीअभावी बियाणे आणि खतांची गोदामे फुल्ल असून कोट्यवधी रुपयांचा माल पडून असल्याचे चित्र दिसत आहे. ६० हेक्टरवर भात, सोयाबीन, भुईमूग, ज्वारी, बाजरीची पेरणी झाली आहे.
दररोजच्या नवीन हवामान अंदाजामुळे बळीराजा मात्र चांगलाच गोंधळला आहे. यावर्षी पाऊस अनुकूल व वेळेवर येत असल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाकडून मिळाल्यानंतर सर्वांना अपेक्षा होती ती दमदार पावसाची. परंतु नवीन अंदाजानुसार मान्सून लांबल्याचे भाकीत हवामानशास्त्र विभागामार्फत वर्तविले जात आहे. जूनच्या शेवटच्या आठवड्यातही पाऊस न पडल्याने पेरण्यांवर परिणाम झाला आहे. जिल्ह्यात चालूवर्षी खरीप हंगामासाठी दोन लाख ९० हजार हेक्टरवर विविध पिकांची पेरणी होण्याची शक्यता आहे. खरिपाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाच्यावतीने तयारी सुरु केली होती. ज्वारीचे सर्वाधिक ६४ हजार हेक्टर क्षेत्र असून त्यापाठोपाठ सोयाबीनचा ५८ हजार ८०० हेक्टरवर पेरा होईल. हंगामासाठी सव्वा लाख टन खत लागेल. युरिया, डीएपी, एस.एस.पी., एमओपी, याशिवाय अन्य मिश्रखते मागविण्यात आली आहेत. मागणीनुसार निम्म्याहून अधिक खताचा पुरवठा झाला आहे. परंतु पावसाअभावी खत पडून राहिल्याचे दिसून येते. पेरण्यांसाठी ५० हजार २२९ क्विंटल बियाणांची मागणी नोंदविली आहे. सरकारी व खासगी कंपन्यांकडून खते आणि बियाणांचा पुरवठा सुरु झाला आहे.
जिल्ह्यात सुमारे साठ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. यात वाळवा, शिराळा, पलूस तालुक्यांचा समावेश आहे. शिराळ्यात भाताची धूळवाफेवर पेरणी झाली. वाळवा, पलूस, मिरज पश्चिम भाग या नदीकाठावर सोयाबीन आणि भुईमुगाची टोकण पूर्ण झाली आहे. परंतु पाऊस नसल्याने वाढीवर परिणाम होत असल्याचे चित्र आहे. पेरणीसाठी जमिनीची मशागत शेतकºयांनी पूर्ण केली आहे. जिल्ह्यात गेल्यावर्षी २७ जून २०१७ अखेर सरासरी ८९.८ टक्के, तर यावर्षी याच तारखेला दि. २७ जून २०१८ अखेरपर्यंत १३३.४ टक्के पाऊस पडला आहे. प्रत्यक्षात मात्र शेतकºयांनी पाऊस नसल्यामुळे पेरण्या थांबविल्या आहेत. मृग नक्षत्र सुरु होऊन सात-आठ दिवस उलटल्यानंतर देखील पावसाचा जोर अद्याप वाढलेला नाही.
पिकांसह कडधान्याच्या पेरण्या करतात, परंतु पाऊस नसल्याने याचा परिणाम उत्पादनावरही होऊन उत्पादनात घट होणार आहे. जून महिन्यातील मृग नक्षत्र हे खरिपातील पेरण्यांसाठी पोषक वातावरण असलेले नक्षत्र मानले जाते. साधारणपणे जून महिन्यात पेरणीयोग्य जोरदार पाऊस झाला, तर शेतकरी पेरणीस सुरुवात करतो. जून महिन्यात पिकाची पेरणी झाली की मग ही पिके वेळेत येतात. पुढील रब्बी हंगामातील पिकांचे व्यवस्थित नियोजन करता येते. त्यामुळे जून महिन्यात पेरणी करण्याकडे शेतकºयांचा जास्त कल असतो. नक्षत्राच्या कालावधीनुसार पिकांची पेरणी केल्यास पिके रोगराईला बळी न पडता उत्पन्नही चांगले मिळते, असे अनेक शेतकºयांचे मत आहे.
जिल्ह्यातील पाऊस
(सरासरी टक्केवारी)
तालुका २७ जून २०१७ २७ जून २०१८
मिरज ४७.५ १८१.७
जत १४९.९ ११८.५
खानापूर ७२.३ १६९.१
वाळवा ६२.६ ९५.७
तासगाव ४९.२ ५८.१
शिराळा ७५.७ १०७.९
आटपाडी २१७.१ १२३.२
क़महांकाळ २५९.२ १०२.६
पलूस ५४.२ ४२.४
कडेगाव ६९.३ ४८
खतांची गोदामे फुल्ल
खरीप हंगामासाठी दोन लाख ६० हजार हेक्टर क्षेत्र पेरणीसाठी उपलब्ध आहे. त्यासाठी सव्वा लाख मेट्रिक टन खत लागणार आहे. याशिवाय ५० हजार २२९ क्विंटल बियाणांची मागणी नोंदविण्यात आली. हंगामासाठी कृषी सेवा केंद्रांची खते आणि बियाणांची गोदामे फुल्ल आहेत. परंतु आतापर्यंत अवघ्या दहा टक्केच पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. पाऊस नसल्याने पेरण्या पूर्णपणे थांबल्या असल्याने गोदामातील बियाणे आणि खते पडून असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसत आहे.

Web Title: Sowing of Pavnadon Lakh Hector area due to lack of rain in Sangli district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.