मान्सून खोळंबल्याने सांगलीत खरिपाच्या पेरण्या थांबल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 08:36 PM2018-06-15T20:36:45+5:302018-06-15T20:36:45+5:30
सांगली : मान्सून पावसाची जूनच्या पहिल्या आठवड्यात दमदार एन्ट्री झाल्यामुळे सांगली जिल्'ात शेतकऱ्यांची खरीप पेरण्यांसाठी लगबग चालू होती. मात्र आता पावसाने उघडीप दिल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. कृषी विभागाने जिल्'ात एक लाख २४ हजार टन रासायनिक खत आणि ५० हजार २२९ क्विंटल बियाणांची उपलब्धता केली असून बोगसगिरी रोखण्यासाठी ११ भरारी पथके नियुक्त केली आहेत.
जिल्'ात खरिपाचे सुमारे दोन लाख ९५ हजार हेक्टरपर्यंतचे क्षेत्र आहे. या क्षेत्राला लागणारे बियाणे आणि खते मान्सून पावसापूर्वी उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा परिषद आणि राज्य शासनाच्या कृषी विभागाने नियोजन केले आहे. आटपाडी, जत, कवठेमहांकाळ तालुक्यात बाजरी, कडधान्याच्या पेरणीचे क्षेत्र सर्वाधिक आहे. तासगाव, खानापूर, कडेगाव तालुक्यात ज्वारीचे ६४ हजार हेक्टर क्षेत्र असून त्यापाठोपाठ सोयाबीनचा ५८ हजार ८०० हेक्टरवर पेरा होईल. कृष्णा व वारणा नदीकाठावरील पलूस, वाळवा, मिरज, शिराळा तालुक्यात सोयाबीन आणि भुईमुगाच्या टोकणीला सुरुवात झाल्याचे दिसत आहे. शिराळा तालुक्यात १७ हजार पाचशे हेक्टर भाताचे क्षेत्र असून उन्हाळी पावसानंतर धूळवाफेवर पेरणी झाली आहे.
मागील काही वर्षात मक्याचे क्षेत्रही जिल्'ात वाढले आहे. चालूवर्षीही २८ हजार १०० हेक्टरवर मक्याची पेरणी होण्याचा अंदाज आहे. सूर्यफुलाची पेरणी २६ हजार हेक्टर होईल. याशिवाय तूर ७४०० हेक्टर, मूग ७७०० हेक्टर, उडीद ७८०० हेक्टर क्षेत्र पेरणीसाठी उपलब्ध आहे. पेरणीसाठी एक लाख २४ हजार पन्नास टन रासायनिक खते आणि ज्वारी, बाजरी, मका, सोयाबीन, कडधान्याच्या ५० हजार २२९ क्विंटल बियाण्यांची कृषी विभागाने मागणी केली आहे.