आजी-माजी आमदारांची विट्यात ‘साखर पेरणी’
By admin | Published: December 1, 2015 11:54 PM2015-12-01T23:54:59+5:302015-12-02T00:37:10+5:30
युवा नेत्यांचीही फिल्डिंग : नगरपालिका निवडणुकीची पार्श्वभूमी; शहरातील प्रमुख पॉकेटस्वर नेत्यांचे लक्ष
दिलीप मोहिते-- विटानगरपरिषदेच्या निवडणुकीचा आखाडा अजून वर्षभर पुढे असतानाच, शहरातील प्रमुख पॉकेटस्वर राजकीय नेत्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. पन्नास वर्षाहून अधिक काळ पालिकेची सत्ता हातात ठेवणारे माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी सत्ता शाबूत ठेवण्यासाठी, तर शिवसेनेचे विद्यमान आमदार अनिल बाबर यांनी सत्ताधाऱ्यांच्या सत्तेला सुरूंग लावण्यासाठी तयारी सुरू केली आहे. प्रत्येक प्रभागात बैठका घेऊन, प्रसंगी नाराजांना व कार्यकर्त्यांना बंगल्यावर बोलावून ‘साखर पेरणी’ सुरू केली आहे. त्यातच विद्यमान नगराध्यक्ष वैभव पाटील, नगरसेवक विशाल पाटील यांच्यासह विरोधी शिवसेनेचे अमोल बाबर व पंचायत समितीचे उपसभापती सुहास बाबर यांनीही फिल्डिंग लावल्याचे दिसून येत आहे. खानापूर विधानसभा निवडणुकीला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर, आता विटा पालिका निवडणुकीचे वेध लागले आहेत. नोव्हेंबर २०१६ ला विद्यमान पदाधिकाऱ्यांचा पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण होत आहे. विधानसभा निवडणुकीत विटा शहराने आ. बाबर यांना साथ दिली. त्यामुळे त्यांचा विजय सुकर झाला. माजी आमदार पाटील यांना शहरात मिळालेले कमी मताधिक्य संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून पालिकेतील सत्ताधारी गटाचे नेते, कार्यकर्ते आपण कोठे चुकलो, कसे चुकलो व यापुढील काळात काय करायला पाहिजे, याचे आत्मचिंतन करून त्यापध्दतीने बदल घडविण्याचा प्रयत्न करू लागले आहेत.गेल्या पन्नास वर्षांपासून अधिक काळ पालिकेची सत्ता एकहाती ठेवणाऱ्या माजी आमदार पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या कमी मतांचे कारण शोधून काढून नागरिकांशी संवाद वाढविला असून, नाराजांना एकत्रित करून त्यांची कामे तातडीने मार्गी लावण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यासाठी प्रभागवार बैठका घेण्याचे काम सुरू झाले आहे.दुसरीकडे सत्ताधाऱ्यांच्या हालचालींवर बारीक नजर ठेवून आ. बाबर यांनीही विटेकरांशी जवळीक साधत पालिकेत त्यांची अडलेली कामे पूर्ण करण्याचा सपाटा लावला आहे. पालिका निवडणुकीला अद्याप एक वर्षाचा कार्यकाल बाकी असला तरी, दोन्ही गटातील आजी-माजी आमदारांनी आतापासूनच शहरात ‘साखर पेरणी’ सुरू केल्याने, तो सर्वसामान्यांत चर्चेचा विषय ठरला आहे.