सोयाबीनला विक्रमी ७,८०० रुपये दर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:18 AM2021-07-04T04:18:11+5:302021-07-04T04:18:11+5:30
सांगली : अवकाळी पाऊस, निकृष्ट बियाण्यांमुळे गतवर्षी सोयाबीनच्या उत्पादनात घट झाली होती. मात्र ज्या शेतकऱ्यांनी संयमाने संकटाचा सामना केला, ...
सांगली : अवकाळी पाऊस, निकृष्ट बियाण्यांमुळे गतवर्षी सोयाबीनच्या उत्पादनात घट झाली होती. मात्र ज्या शेतकऱ्यांनी संयमाने संकटाचा सामना केला, त्यांना सध्या चांगले फळ मिळाले आहे. सांगली बाजार समितीमधील सौद्यात शनिवारी सोयाबीनला प्रतिक्विंटल ७८०० रुपये विक्रमी दर मिळाला. हा आतापर्यंतचा सर्वोच्च दर आहे.
जिल्ह्यातील मिरज, वाळवा, तासगाव, पलूस, शिराळा, कडेगाव, खानापूर, कवठेमहांकाळ तालुक्यात ५७ हजार १६१ हेक्टर सोयाबीनचे पेरणी क्षेत्र आहे. गेल्या वर्षी १०० टक्केपर्यंत पेरणी झाली होती, पण खरीप हंगामात प्रमाणापेक्षा अधिक पाऊस झाल्यामुळे उत्पादनास जबर फटका बसला. त्यातच सोयाबीन काढणीवेळी अतिवृष्टीमुळे नुकसान झाले. त्यावेळी शेतकऱ्यांनी मिळेल, त्या दराने सोयाबीनची विक्री केली होती. आता आवक घटली आहे. शिवाय देशांतर्गत आणि परदेशातही मागणी वाढल्यामुळे दरात सातत्याने वाढ होत आहे. बाजारात उच्च प्रतीच्या सोयाबीनला ७८०० रुपये दर मिळाला आहे. हा दर जिल्ह्यात आतापर्यंत सोयाबीनला मिळालेला सर्वोच्च दर ठरला आहे.
बाजारात आता सोयाबीनचा भाव वाढला असला, तरीही आवक मात्र अत्यल्प आहे. शनिवारी १४५० क्विंटलची सांगली मार्केट यार्डात आवक झाली.
चौकट
पेरणीत १० टक्के वाढ
काढणीवेळीच पाऊस आल्याने सोयाबीन भिजले होते. त्यामुळे बाजारात उच्च प्रतीचे सोयाबीन फार कमी आले. यंदा पेरणी क्षेत्र १० टक्के वाढणार आहे. यामुळे बियाण्यांचा दर प्रतिक्विंटल १२ हजार ५०० ते १३ हजार रुपयांपर्यंत गेला आहे. वाढते दर लक्षात घेऊन, शेतकऱ्यांनी जवळ असलेले सोयाबीन पेरावे, असे मत कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.