पंचायत समितीकडून जागा हस्तांतरण
By admin | Published: December 27, 2015 11:54 PM2015-12-27T23:54:54+5:302015-12-28T00:30:41+5:30
रस्ता रूंदीकरण : विद्युत खांबांचा अडथळा कायम, महापालिकेकडून भरपाई
मिरज : मिरजेत शिवाजी मार्गाच्या रुंदीकरणासाठी पंचायत समिती कार्यालयाच्या आवारातील जागा हस्तांतरण व शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्थलांतर पूर्ण झाले आहे. महापालिकेने भरपाई दिल्याने पंचायत समितीने रस्ता रुंदीकरणासाठी जागा हस्तांतरणाची तयारी केल्याने शिवाजी मार्गाचे रुंदीकरण होणार आहे. मात्र शिवाजी रस्त्यावरील विद्युत खांब हटविण्याचे काम रखडल्याने रस्ता रूंदीकरणातील अडथळा कायम आहे.
मिरजेतील शिवाजी मार्गाचे रुंदीकरण अनेक वर्षांपासून रखडले आहे. मार्गाच्या रुंदीकरणासाठी पंचायत समिती आवारातील आठशे चौरस मीटर जागेची महापालिकेने मागणी केली होती. पंचायत समितीच्या आवारातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे स्थलांतर व कुंपणाची नवीन भिंत बांधण्यासाठी पंचायत समितीने यासाठी खर्चाचे अंदाजपत्रक तयार केले होते.
शिवाजी महाराजांचा पुतळा पंचायत समितीच्या आतील बाजूस स्थलांतर करण्यासाठी महापालिकेने १३ लाख ८० हजार रुपयांची भरपाईची रक्कम दिल्याने पुतळ्याचे स्थलांतर पार पडले. मात्र पंचायत समितीने अद्याप जागेचे हस्तांतरण केलेले नाही. महापालिकेने शिवाजी रस्त्याचे डांबरीकरण करुन पंचायत समितीकडे जागेची मागणी केली आहे. मात्र पंचायत समितीने अद्याप जागा हस्तांतरित केली नसल्याने रुंदीकरण रखडले आहे. पंचायत समितीचे कुंपण बांधण्यात आले असून, महापालिकेस जागा हस्तांतरित करण्यात येणार असल्याचे सभापती दिलीप बुरसे यांनी सांगितले.
या रस्त्यावरील विद्युत खांब हटविण्याचे काम गेली तीन वर्षे रखडल्याने वाहतुकीचा अडथळा कायम आहे. (वार्ताहर)
पालिकेने दिले १३ लाख ८० हजार
महापालिकेने १३ लाख ८० हजार रुपयांची भरपाईची रक्कम दिल्याने पुतळ्याचे स्थलांतर पार पडले. मात्र पंचायत समितीने अद्याप जागेचे हस्तांतरण केलेले नाही. महापालिकेने शिवाजी रस्त्याचे डांबरीकरण करुन पंचायत समितीकडे जागेची मागणी केली आहे. मात्र पंचायत समितीने अद्याप जागा हस्तांतरित केली नसल्याने रुंदीकरण रखडले आहे.