उद्धट कर्मचाऱ्यांना वेळीच आवर घाला
By admin | Published: June 16, 2015 01:32 AM2015-06-16T01:32:52+5:302015-06-16T01:32:52+5:30
जावळी पंचायत समिती सभा : शाळा परिसरात गतिरोधकाचा ठराव
मेढा : रस्त्यावर काम पाहणाऱ्या कर्मचाऱ्याला लोकप्रतिनिधींनी काही विचारले तर उद्धट उत्तर दिले त्याच्यावर काय कारवाई केली? असा प्रश्न करून अशा कर्मचाऱ्यांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे,’ अशा कडक शब्दात पंचायत समिती सदस्य मोहनराव शिंदे यांनी सभागृहात नाराजी व्यक्त केली. या घटनेची नोंद सभापती सुहास गिरी यांनी घेत संबंधित कर्मचाऱ्याच्या खातेनिहाय चौकशीचे आदेश देऊन तसा ठराव सर्वानुमते करण्यात आला.
जावळी पंचायत समितीची मासिक सभा बाबासाहेब आखाडकर सभागृहात सभापती सुहास गिरी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. उपसभापती निर्मला कासुर्डे, सदस्य हणमंतराव पार्टे, मोहनराव शिंदे, रूपाली वारागडे, सारिका सपकाळ, कृषी अधिकारी डॉ. बागल, गटविकास अधिकारी गजानन भोसले आदी विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
प्रारंभी कुडाळ येथील अपघातात निधन पावलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यात आली. यानंतर सभेस प्रारंभ झाला. सार्वजनिक बांधकाम उपविभाग जावळी (मेढा)चे कर्मचारी गणेश कर्वे आढावा देण्यासाठी उभे राहिले असता सदस्य मोहनराव शिंदे यांनी ‘तुमच्या त्या कर्मचाऱ्यावर काय कारवाई केली किंवा त्यास या सभेस हजर करण्यास सांगितले होते त्याचे काय केले?,’ असा प्रश्न केला. त्यावर कर्वे यांनी क्षमा मागण्याचा प्रयत्न केला; परंतु त्याने सभागृहातील सदस्यांचे समाधान झाले नाही.
सार्वजनिक बांधकाम उपविभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर येत असताना आणि वादावादी होत असताना सभापती सुहास गिरी यांनी कर्वे यांना कानपिचक्या देत मतभेद आमचे अंतर्गत असतील; पण असा लोकप्रतिनिधींचा अवमान झालेला आम्ही कदापि सहन करणार नाही, असे सांगून त्यांनी पवार यांची चौकशी करण्याच्या सूचना दिल्या. त्यांच्यावर कारवाई करण्याचा ठराव केला
यावेळी वेळावेळी होणारे अपघात आणि भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनांना आवर घालण्यासाठी शाळा तसेच महाविद्यालयांच्या ठिकाणी गतिरोधक बसविण्याची मागणी रूपाली वारागडे यांनी केली. त्याबाबतचा ठराव मंजूर करण्यात आला. (प्रतिनिधी)