‘स्वाभिमानी’च्या दूध आंदोलनाची ठिणगी; केदारवाडीजवळ टँकर फोडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 11:22 PM2018-07-15T23:22:44+5:302018-07-15T23:23:23+5:30
इस्लामपूर/कासेगाव : पुणे-बंगळूर महामार्गावरील केदारवाडी (ता. वाळवा) फाट्यावर रविवारी दूध आंदोलनाची ठिणगी पडली. सायंकाळी पाच वाजता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंबेगाव (पुणे) येथील गोवर्धन दूध संघाचा दूध वाहतूक करणारा टॅँकर फोडून दूध रस्त्यावर सांडले.
दूध उत्पादकांना थेट पाच रुपये अनुदानाच्या मागणीसाठी खासदार राजू शेट्टी यांनी सोमवार, दि. १६ जुलैपासून राज्यभर ‘दूध बंद’ आंदोलनाची घोषणा केली आहे. मात्र रविवारीच केदारवाडी फाट्यावर या आंदोलनाची झलक पाहण्यास मिळाली.
बंगळूरहून आंबेगाव येथील गोवर्धन दूध डेअरीला दूध पुरवठा करण्यासाठी निघालेला टॅॅँकर (क्र. एमएच १६, सी ६९९९) स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अडविला. किणीपासून कार्यकर्ते या टॅँकरचा पाठलाग करीत होते. केदारवाडीजवळ त्यांनी चालकाला थांबण्यास भाग पाडले. टॅँकरच्या समोरील बाजूच्या काचा फोडल्या. टँकरच्या मागील बाजूचे व्हॉल्व्ह उघडून टँकरमधील दूध रस्त्यावर सोडून दिले. घटनेची माहिती मिळताच कासेगाव पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. टॅँकर ताब्यात घेऊन कासेगाव पोलीस ठाण्यात आणून उभा केला. याबाबत चालक विलास किसन कोठावळे (रा. निगुज, जि. अहमदनगर) यांनी फिर्याद दिली आहे.
शेट्टींची पोलिसांशी बाचाबाची
रविवारी दुपारी खासदार राजू शेट्टी कºहाड येथे एका खासगी कार्यक्रमासाठी निघाले होते. यावेळी महामार्गावर उभ्या असलेल्या एका दूध वाहतूक करणाऱ्या टॅँकरचालकाला अडवून पोलीस चौकशी करीत होते. खासदार राजू शेट्टी यांनी तेथे थांबून, नेमके काय सुरू आहे, याची माहिती घेतली. यावेळी शेट्टी व पोलिसांची बाचाबाची झाली. यानंतर शेट्टी कºहाडकडे रवाना झाले. गैरसमजातून हा प्रकार घडल्याचे सांगत वरिष्ठ अधिकाºयांनी कºहाड येथे शेट्टी यांची दिलगिरी व्यक्त केली.
गावोगावी बैठका
आंदोलनाच्या पहिल्या दिवसापासूनच दूध उत्पादक शेतकºयांनी दूध संकलन बंद ठेवून आंदोलनात सहभाग घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी तालुक्यातील अनेक गावांमध्ये बैठका घेण्यात आल्या आहेत. गाईच्या दुधाचा खरेदी दर वाढवावा व शेतकºयांना थेट ५ रूपये अनुदान द्यावे, या मागणीसाठी पुकारलेल्या दूध आंदोलनामुळे तालुक्यातील दूध डेअरीला जाणारच नसल्याचे बोलले जात आहे.