भाजप नेत्यांच्या कुंडल्या जनतेसमोर मांडू
By admin | Published: March 5, 2017 11:29 PM2017-03-05T23:29:01+5:302017-03-05T23:29:01+5:30
पृथ्वीराज पवार : सांगलीत संभाजी पवार गटाची बैठक; शतप्रतिशत शिवसेनेचा निर्धार
सांगली : सांगलीतील माजी आमदार संभाजी पवार गटाच्या पक्षांतराच्या चर्चेला पूर्णविराम देत रविवारी ‘शतप्रतिशत शिवसेना’चा निर्धार कार्यकर्त्यांच्या बैठकीत करण्यात आला. आगामी महापालिकेसह सांगली विधानसभा मतदार संघातील ग्रामीण भागातही गल्लोगल्ली शिवसेनेची शाखा उघडण्यात येणार असून, संघटनेच्या बांधणीवर लक्ष केंद्रित करणार आहोत. काँग्रेस, राष्ट्रवादीसह भाजप हाही एक क्रमांकाचा शत्रू असून, सर्वच निवडणुकांत भाजप नेत्यांच्या कुंडल्या जनतेसमोर मांडण्याचा इशारा शिवसेनेचे नेते पृथ्वीराज पवार यांनी दिला
सांगलीतील केशवनाथ मंदिर परिसरात रविवारी माजी आमदार संभाजी पवार गटाची बैठक झाली. या बैठकीला पृथ्वीराज पवार, नगरसेवक गौतम पवार, स्वाभिमानीचे सचिव सतीश साखळकर, अजिंक्य पाटील, रावसाहेब घेवारे, नगरसेवक शिवराज बोळाज, बाळासाहेब गोंधळी, हेमंत खंडागळे उपस्थित होते.
बैठकीत बोलताना पृथ्वीराज पवार म्हणाले की, गेली चाळीस वर्षे संभाजी पवार यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीविरोधात लढा दिला. आता भाजप हा एक नंबरचा प्रतिस्पर्धी आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची संघटनात्मक बांधणी केली. त्या जोरावर भाजप राज्यात व दिल्लीत सत्तेवर आली; पण भाजप मूळ विचारधारेपासून दूर गेला आहे. याउलट शिवसेना विचारधारेशी प्रामाणिक राहिली आहे. मुंबई महापालिकेत सत्ता व पैशाचा जिवावर भाजप लढली. मूळ विचारधारेपासून लांब गेल्यानेच जनसंघापासून भाजपसोबत असलेल्या कार्यकर्त्यांनी त्यांना मतदान केले नाही. नव्याने भाजपमध्ये आलेल्यांनाही मूळच्या भाजपने अद्याप स्वीकारलेले नाही.
सांगली विधानसभा मतदार संघातील अकरा गावे व महापालिका हद्दीत शिवसेनेची संघटनात्मक बांधणी करणार आहोत. त्यासाठी गल्लोगल्ली शिवसेनेच्या शाखा उघडल्या जातील. नागरिकांच्या प्रश्नांवर लढा उभारला जाईल.
यापूर्वी आम्ही काँग्रेस, राष्ट्रवादीशी लढत होतो. त्यावेळीही संभाजी पवार यांना अनेक आॅफर आल्या; पण आम्ही मूळ विचार सोडला नाही. भ्रष्टाचारविरोधात लढताना कुणालाही भीक घातली नाही. यापुढेही महापालिकेची निवडणूक असो अथवा ग्रामपंचायतीच्या निवडणुका, आम्ही भाजप नेत्यांच्या कुंडल्या जनतेसमोर मांडू, असे सांगितले.
गौतम पवार म्हणाले की, गेल्या दोन महिन्यांत झालेल्या निवडणुकांत सर्वच पक्षात उमेदवारांची आयात-निर्यात सुरू होती; पण शिवसेना मात्र स्वत:च्या कार्यकर्त्यांच्या ताकदीवर लढत होती. गेली २० वर्षे गवतही वाढणार नाही, अशी हेटाळणी करणाऱ्या भाजपला संभाजी पवार यांनी वाढविले; पण विधानसभेवेळी आमचा विश्वासघात करण्यात आला. या अडचणीच्या काळात शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे मदतीला धावले. कुणी कितीही अफवा उठविल्या तरी, आम्ही डगमगणार नाही, असे सांगितले.
यावेळी विशाल पवार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. शिवराज बोळाज, सतीश साखळकर, रावसाहेब घेवारे, अजिंक्य पाटील, नीलेश हिंगमिरे यांची भाषणे झाली. (प्रतिनिधी)