ले-आॅफवरून अध्यक्ष-कामगारांत वादावादी
By admin | Published: February 15, 2017 11:29 PM2017-02-15T23:29:42+5:302017-02-15T23:29:42+5:30
वसंतदादा साखर कारखाना : अध्यक्षांकडून पगाराचे आश्वासन
सांगली : येथील वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांनी कामगारांपुढे ‘ले-आॅफ’ घेण्याचा प्रस्ताव दिला असून, यावरूनच पाटील आणि कामगारांमध्ये बुधवारी वादावादी झाली. यापुढे कामावर येणाऱ्यांना पगार देऊ शकत नाही आणि जे ‘ले-आॅफ’ घेतील, त्यांचेही नुकसान करणार नाही. त्यांना मे, डिसेंबरचे पगार दोन दिवसात देण्याचे आश्वासन त्यांनी दिल्यामुळे वादावर पडदा पडला.
वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्यातील कामगारांना ‘ले-आॅफ’ देण्यावरून गेल्या दोन महिन्यापासून कारखाना प्रशासन आणि कामगारांमध्ये संघर्ष चालू आहे. कामगार युनियनचे पदाधिकारीही वादात पडले आहेत. बुधवारी कामगार कारखान्याच्या प्रवेशद्वारामध्ये जमले होते. साखर कामगार युनियनचे अध्यक्ष विलास पाटील, सरचिटणीस प्रदीप शिंदे यांनी कामगारांच्या मे, डिसेंबर महिन्याच्या पगाराचा प्रश्न उपस्थित करून, अध्यक्ष पाटील यांना ठोस निर्णय घेण्याची मागणी केली. अखेर पाटील यांनी, कार्यालयात बसून चर्चा करून तोडगा काढण्याची सूचना केली. त्यानुसार कारखान्याच्या कार्यालयात विशाल पाटील व युनियनचे पदाधिकाऱ्यांत चर्चा झाली. अखेर नियमित कामगारांना मे, डिसेंबर आणि हंगामी कामगारांना डिसेंबरच्या पगाराचे एकत्रित एक कोटी ७२ लाख रुपये दोन दिवसात देण्यात येतील, असे आश्वासन अध्यक्षांनी दिले. सध्या कारखान्याची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे कामगारांना यापुढे पगार देता येणार नाही. त्यामुळे कामगारांनी ‘ले-आॅफ’ घ्यावा. जरी कारखाना अन्य संस्थेकडे चालविण्यास दिला तरी, त्या कामगारांना थकीत पगारासह न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे. यातूनही जे कामगार कामावर येतील, त्यांचे पगार मात्र मी देऊ शकणार नाही. ज्यावेळी अन्य संस्थेशी करार होईल, त्यावेळी त्यांच्याकडून पैसे मिळाल्यानंतरच यापुढील पगार मिळतील, असेही विशाल पाटील यांनी स्पष्ट केले.
यावेळी काही कामगारांनी, थकीत पगार, फंड आणि अन्य देण्यांचा प्रश्न मार्गी लावण्याची सूचना केली. पाटील यांनी, कारखाना चालवायला दिल्यानंतर त्यांच्याकडून करारापोटी येणाऱ्या पैशातूनच ही थकीत देणी देणार असल्याचे आश्वासन दिले. यानंतर कामगारांनी आंदोलन मागे घेत विशाल पाटील यांच्या प्रस्तावास सहमती दर्शविल्याचे प्रदीप शिंदे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)