किसान क्रेडिट कार्ड वितरणासाठी जिल्ह्यात विशेष मोहीम : चौधरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2020 02:15 PM2020-02-11T14:15:05+5:302020-02-11T14:17:06+5:30

केसीसी कार्ड धारक नसलेल्या सर्व शेतकऱ्यांना विशेष ग्राम सभा घेऊन आणि त्यांच्या पर्यंत पोहचून केसीसी कार्ड वितरीत करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिल्या आहेत.

Special campaign for distribution of Kisan Credit Cards in the district: Choudhary | किसान क्रेडिट कार्ड वितरणासाठी जिल्ह्यात विशेष मोहीम : चौधरी

किसान क्रेडिट कार्ड वितरणासाठी जिल्ह्यात विशेष मोहीम : चौधरी

Next
ठळक मुद्देकिसान क्रेडिट कार्ड वितरणासाठी जिल्ह्यात विशेष मोहीम : चौधरीकेसीसी कार्ड धारकांची संख्या 1 लाख 75 हजार हजारांच्या आसपास

सांगली : केंद्र सरकारच्या कृषी आणि किसान विकास मंत्रालयातर्फे काढण्यात आलेल्या आदेशानुसार दिनांक 8 फेब्रुवारी पासून पुढील 15 दिवसांसाठी सर्व शेतकरी बांधवाना किसान क्रेडिट कार्ड (केसीसी) योजनेत सामावून घेण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत.

या कामी सर्व बँका, कृषी विभाग, मत्स्यपालन विभाग, पशुपालन विभाग यांच्या संयुक्त प्रयत्नातून किसान सन्मान योजनेमध्ये लाभार्थी असणाऱ्या परंतु केसीसी कार्ड धारक नसलेल्या सर्व शेतकऱ्यांना विशेष ग्राम सभा घेऊन आणि त्यांच्या पर्यंत पोहचून केसीसी कार्ड वितरीत करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिल्या आहेत.

केंद्र सरकारने मागील वर्षापासून शेतकऱ्यांना अर्थ सहाय्य रूपाने 6 हजार रूपये वार्षिक मदत जाहीर केली आहे. परंतु मंत्रालयाच्या असे निदर्शनास आले आहे की प्रधान मंत्री किसान योजनेत सहभागी असणाऱ्या बऱ्याच शेतकऱ्यांकडे किसान कार्ड उपलब्ध नाहीत. असे शेतकरी केसीसी कार्डाच्या माध्यमातून मिळणाऱ्या विविध योजनांपासून वंचित राहतात.

अशा कार्ड नसलेल्या शेतकऱ्यांशी संपर्क साधून आणि त्यांच्याकडून माहिती घेऊन सर्व बँकांनी पंधरा दिवसात त्यांना केसीसी कार्ड वितरीत करावयाचे आहे. देशभरात राबवण्यात येणाऱ्या या विशेष उपक्रमांतर्गत ज्या शेतकऱ्यांकडे केसीसी कार्ड नाही त्यांनी नजीकच्या बँक शाखेकडे संपर्क साधून एक पानी अर्ज भरून द्यावा. सर्व बाबींची पूर्तता झाल्यावर बँकामार्फत अशा शेतकऱ्यांना त्वरित केसीसी कार्ड वितरीत केले जाईल.

जे शेतकरी केसीसी कार्ड धारक आहेत पण त्यांचे कार्ड वापरात नसल्याने बंद आहे, अशा शेतकऱ्यांनाही या योजनेंतर्गत नवीन कार्ड देण्यात येईल. या विशेष उपक्रमांतर्गत वितरीत करण्यात येणाऱ्या नवीन केसीसी कार्डासाठी कोणतेही शुल्क बँकाकडून आकारण्यात येणार नाही. या कार्डाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना केवळ अल्पदरात पीक कर्जच नाही तर उपलब्ध मर्यादेपर्यंत शेतीपूरक व्यवसाय उदा. पशु पालन आणि मत्स्यपालन व्यवसायालाही कर्ज मिळेल.

जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सर्व बँका, कृषी विभाग, मत्स्यपालन विभाग, ग्रामीण विकास यंत्रणा, ग्रामपंचायत, पटवारी यांना सूचना देऊन आणि बँक शाखानिहाय मेळावे घेऊन जास्तीत जास्त शेतकऱ्यांना केसीसी कार्ड वितरीत करण्याचे आदेश दिले आहेत.

सांगली जिल्ह्यात आजपर्यंत एकूण 3 लाख 20 हजार शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेचा लाभ घेतला आहे. या उलट जिल्ह्यात उपयोगात असलेल्या केसीसी कार्ड धारकांची संख्या 1 लाख 75 हजार हजारांच्या आसपास आहे. उर्वरित शेतकऱ्यांना केसीसी कार्ड वितरीत करून या योजनेतील लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याचे काम सर्व संबंधित विभागांना करावयाचे आहे, असे निर्देशही जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.

या मोहिमेच्या प्रगतीचा वेळोवेळी आढावा जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी घेणार असून जिल्ह्यातील बँकांच्या सर्व शाखांनी या मोहिमेसाठी शाखा पातळीवर मेळावे आयोजित करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना केसीसी कार्ड वितरीत करावे. तसेच या कामासाठी सर्व संबंधित विभागांनी त्यांच्या तालुका, ग्रामस्तरीय यंत्रणेमार्फत बँकांना सहकार्य करावे, असे आवाहन अग्रणी जिल्हा प्रबंधक आर.पी. यादव यांनी केले आहे.

Web Title: Special campaign for distribution of Kisan Credit Cards in the district: Choudhary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.