एसपी, डीवायएसपींची चौकशी विशेष पोलीस महानिरीक्षक सांगलीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2017 01:38 AM2017-11-19T01:38:37+5:302017-11-19T01:41:16+5:30
सांगली : पोलीस कोठडीतील अनिकेत कोथळे याच्या हत्येप्रकरणी चौकशीसाठी शनिवारी जिल्हा पोलीसप्रमुख दत्तात्रय शिंदे व पोलीस उपअधीक्षक डॉ. दीपाली काळे शनिवारी सीआयडीपुढे हजर
सांगली : पोलीस कोठडीतील अनिकेत कोथळे याच्या हत्येप्रकरणी चौकशीसाठी शनिवारी जिल्हा पोलीसप्रमुख दत्तात्रय शिंदे व पोलीस उपअधीक्षक डॉ. दीपाली काळे शनिवारी सीआयडीपुढे हजर झाले. पुणे विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील रामानंद यांनी गुन्ह्याचा आढावा घेऊन त्यांच्याकडून माहिती घेतली. रात्री उशिरापर्यंत चौकशीचे काम सुरू होते.
दरम्यान, सीआयडीने बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटेसह सहाजणांच्या घरांवर छापे टाकून झडती सुरू केली आहे.
सांगली शहर पोलिसांनी दि. ५ रोजी लुटमारीच्या गुन्ह्यात अनिकेत कोथळेला अटक केली होती. गुन्हा कबूल करण्यासाठी त्याला नग्न करून उलटे टांगून बेदम मारहाण केली होती. त्याचे तोंड पाण्याने भरलेल्या बादलीत बुडविल्याने तो मृत झाला. हे प्रकरण अंगलट येऊ नये, यासाठी त्याचा मृतदेह दि. ६ रोजी आंबोली (जि. सिंधुदुर्ग) येथे जंगलात नेऊन जाळला. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे, हवालदार अनिल लाड, अरुण टोणे, राहुल शिंगटे, नसरुद्दीन मुल्ला व झिरो पोलिस झाकीर पट्टेवाले अटकेत आहेत. या गुन्'ाच्या तपासाचा आढावा घेण्यासाठी सुनील रामानंद शुक्रवारी रात्री सांगलीत दाखल झाले. शनिवारी सकाळी ते सीआयडी कार्यालयात आले. अप्पर पोलिस अधीक्षक नरेंद्र गायकवाड, उपअधीक्षक मुकुंद कुलकर्णी यांच्याकडून तपासाचा आढावा घेतला.
सकाळी अकरा वाजता ते शहर पोलिस ठाण्यात दाखल झाले. ज्या ‘डीबी’ रूममध्ये अनिकेतला मारले, त्या रूमची त्यांनी पाहणी केली. मृतदेहाची विल्हेवाट लावण्यास वापरलेल्या मोटारीची पाहणी केली. त्यानंतर चौकशी व तपासाचा पुढील आढावा घेण्यासाठी ते शहर पोलिस ठाण्यातच थांबले. दुपारी बारा वाजता पोलिस उपअधीक्षक डॉ. दीपाली काळे शहर पोलिस ठाण्यात सीआयडीच्या पथकापुढे हजर झाल्या. अनिकेत व अमोल भंडारे पळून गेल्याचा बनाव करून तशी फिर्याद कामटेने दाखल केली होती. हा गुन्हा घडल्यापासून खरा प्रकार उघडकीस येईपर्यंत पोलिसांनी काय तपास केला, याचा उलगडा कसा झाला, अनिकेत कोथळे व अमोल भंडारेला लुटमारीच्या गुन्'ात अटक कधी केली, लुटमारीच्या गुन्'ातील फिर्यादी खरा आहे का, याबद्दल माहिती घेतली. दुपारी दोन वाजता सुनील रामानंद शहर पोलिस ठाण्यातून बाहेर पडले. त्यांच्यासोबत दीपाली काळेही बाहेर पडल्या. त्यानंतर तासाभराने पुन्हा ते शहर पोलिस ठाण्यात दाखल झाले.
अनिकेतच्या भावांचा जबाब
सीआयडीने शनिवारी मृत अनिकेत कोथळेचे भाऊ आशिष व अमित कोथळे यांचा जबाब नोंदवून घेतला. अनिकेतला अटक केल्यापासून त्याच्या घातपातापर्यंत जी माहिती स्थानिक पोलिसांनी त्यांना दिली, त्याबद्दल विचारणा करण्यात आली.