ईश्वरपूरच्या नामकरणाची विशेष सभा रद्द, शिवसैनिकांचे शक्तीप्रदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2021 03:02 PM2021-12-17T15:02:15+5:302021-12-17T15:02:44+5:30
शिवसेनेचे आनंदराव पवार हे शिवसैनिकांना सोबत घेत शक्तीप्रदर्शन करत नागरिकांनी स्वाक्षरी केलेला दस्तऐवज घेऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा जयघोष करत सभागृहात आले. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.
इस्लामपूर : गेल्या काही दिवसांपासून शहरात गाजत असलेल्या इस्लामपुरचे ईश्वरपूर असे नामकरण करण्याच्या मुद्द्यावर आयोजित विशेष सभा कोरम अभावी रद्द करण्यात आली. या सभेकडे राष्ट्रवादी-अपक्ष आघाडीने पाठ फिरवली तर विकास आघाडीच्या चार सदस्यांनी दांडी मारली.
पालिका सभागृहात आज अनेक पक्ष आणि संघटनांनी केलेल्या मागणीनुसार ईश्वरपूर या नामकरणासाठी विशेष सभा घेण्यात आली. नगराध्यक्ष तथा पिठासीन अधिकारी निशिकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्याधिकारी वैभव साबळे यांच्या उपस्थितीत ही सभा होती.
शिवसेनेचे आनंदराव पवार हे शिवसैनिकांना सोबत घेत शक्तीप्रदर्शन करत नागरिकांनी स्वाक्षरी केलेला दस्तऐवज घेऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा जयघोष करत सभागृहात आले. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.
सभेचे कामकाज सुरू होण्यासाठी कायद्यानुसार १५ सदस्य उपस्थित असणे बंधनकारक असते. आजच्या सभेला ३२ पैकी केवळ १० सदस्य उपस्थित होते. त्यामुळे गणपूर्ती होत नसल्याने ही सभा रद्द करण्यात आल्याचे नगराध्यक्ष पाटील यांनी जाहीर केले. शहराच्या नामकरणाच्या मुद्द्यावर सत्ताधारी विकास आघाडीचे अमित ओसवाल, चेतन शिंदे, अन्नपूर्णा फल्ले यांच्यासह कोमल बनसोडे यासुद्धा सभेला अनुपस्थित राहिल्या होत्या.
शिवसेनेचे आनंदराव पवार म्हणाले, आज शहराच्या दृष्टीने महत्वाचा दिवस होता. शहराचे नाव ईश्वरपूर करावे अशी इच्छा या शहरातील बारा-बलुतेदार समाजबांधवांनी व्यक्त केली आहे.या मागणीला जवळपास ३५ हजार नागरिकांनी स्वाक्षरी करून पाठिंबा दिला आहे. आज जे सदस्य गैरहजर आहेत त्यांनी या जनतेचा अवमान केला आहे. त्यांना ही जनता त्यांची जागा दाखवून देईल.
नगराध्यक्ष पाटील म्हणाले, जनतेने निवडून दिलेल्या सदस्यांनी सभागृहात येऊन आपली भूमिका मांडायला हवी होती.मात्र गणपूर्तीअभावी ही सभा रद्द करत आहे. पुढील सभा २७ डिसेंबरला याच आणि इतर विषयांवर होईल असे त्यांनी जाहीर केले.आजच्या सभेला पवार यांच्यासह विक्रम पाटील, वैभव पवार, शकील सय्यद, प्रदीप लोहार, सीमा पवार, सुप्रिया पाटील, प्रतिभा शिंदे आणि मंगल शिंगण उपस्थित होत्या.