बोथे प्रकरणामागे भावकीतलाच वाद

By admin | Published: January 19, 2015 11:54 PM2015-01-19T23:54:37+5:302015-01-20T00:00:48+5:30

पालकमंत्री : पोलिसांवर राजकीय दबाव नाही

Speech only after Bothe's death | बोथे प्रकरणामागे भावकीतलाच वाद

बोथे प्रकरणामागे भावकीतलाच वाद

Next

सातारा : ‘बोथे जिलेटिन स्फोट प्रकरणात रंग्विला जात असलेला ‘दबाव’ कपोलकल्पित आहे. दिल्ली किंवा मुंबई असा कुठूनही यात दबाव नाही. जो काही वाद आहे, तो स्थानिक पातळीवरील भावकीतल्या राजकारणातून निर्माण झाला आहे. या प्रकरणात पोलीस योग्य दिशेने काम करीत आहेत,’ असे स्पष्टीकरण पालकमंत्री विजय शिवतारे यांनी पत्रकार परिषदेत केले.
पालकमंत्र्यांनी आज, सोमवारी सकाळी कोयना धरण वीजनिर्मिती प्रकल्पाला भेट दिली. यानंतर सातारच्या विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. बोथे स्फोटाला दहा दिवस उलटून गेले असले तरीही अद्याप दोषींवर कारवाई झाली नसल्याचा मुद्दा पत्रकारांनी उपस्थित केला. याबाबत पालकमंत्री म्हणाले, ‘बोथे येथे परकी गुंतवणूकदारांच्या माध्यमातून प्रकल्प उभारला आहे.स्फोटानंतर मी घटनास्थळाला भेट देऊन स्फोटातील मृतांच्या नातेवाइकांना शासनातर्फे प्रत्येकी दोन लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. स्फोटाला कारणीभूत असणाऱ्या कंपनीने मृतांच्या नातेवाइकांना तसेच जखमींनाही मदत केली पाहिजे, या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. जिलेटिनच्या कांड्या पुरविणारी कंपनी दोषी असल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे. दोषींवर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षकांना केल्या आहेत. तपास योग्य दिशेने सुरू आहे.’ दोषींना आपण क्लीन चिट देता का, या प्रश्नावर पालकमंत्री आक्रमक झाले. ‘मी न्यायाधीश नाही. माण तालुक्यातील स्थानिक राजकारणातून चुळबूळ सुरू आहे. ‘याला आत घाला...त्याला बाहेर काढा,’ असे सांगितले जात आहे. पण माझी भूमिका स्पष्ट आहे. दोषींना न्यायालय काय शिक्षा द्यायचे ते देईल,’ असे ते म्हणाले.कोयना वीजनिर्मिती प्रकल्पाच्या बोगद्यात अधिकाऱ्यांसह पाहणी केल्याचे सांगून पालकमंत्री म्हणाले, ‘येथील पॉवर जनरेशनचा प्रकल्प गुंडप्रवृत्तींमुळे बंद पडला आहे. या प्रकल्पाचे काम पुन्हा सुरू करता येईल, हे लक्षात आले. काही तथाकथित नेते आर्थिक मागणी करत या प्रकल्पाच्या कामगार व अभियंत्यांना मारहाण करत आहेत. पोलिसांना त्यांचा बंदोबस्त करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जिल्ह्याच्या हिताच्या आड येणाऱ्यांची गय करणार नाही.’
‘पाचशे खाटांचे हॉस्पिटल व वैद्यकीय महाविद्यालय उभारणीसाठी कृष्णानगर येथील पन्नास एकर जागा उपलब्ध आहे. ती कृष्णा खोरे विकास महामंडळाची असल्याने शासनाला जागेसाठी कोणताही खर्च करावा लागणार नाही.
या प्रकल्पासाठी पन्नास ते साठ वर्षांनंतरचा अंदाज घेऊन ‘मास्टर प्लान’ तयार करण्यात येईल. तसेच पुण्याच्या धर्तीवर खावलीतील वैद्यकीय रुग्णालयासाठी असलेली प्रस्तावित जागा प्रादेशिक परिवहन कार्यालयासाठी विकसित करणार आहे,’ अशी माहिती त्यांनी दिली.दरम्यान, पालकमंत्र्यांची पत्रकार परिषद संपताच याच ठिकाणी माजी पालकमंत्री शशिकांत शिंदे हेही विश्रामगृहात हजर झाले. त्यांनीही बोथे प्रकरणातील दोषींवर कारवाई होणे आवश्यक असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)

पुरंदर, जिहे-कठापूरला एकाचवेळी मान्यता
‘पुरंदर उपसा योजना व जिहे-कठापूर या दोन योजनांना एकाच वेळी मान्यता मिळाली होती; परंतु पुरंदर योजना पूर्ण झाली. आता जिहे-कठापूरही दोन वर्षांत मार्गी लावणार आहे. सत्ता नसताना माझ्या मतदारसंघात ८८७ कोटींची कामे केली. आता तर सत्ताच हातात आहे. त्यामुळे अभिनव काम करून दाखविण्याची संधी मी सोडणार नाही,’ असेही पालकमंत्री म्हणाले.

बोथे येथील स्फोटाला मूळ कंपनीच जबाबदार आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई होण्यासाठी मी विधिमंडळात लक्षवेधी टाकणार आहे. मृतांच्या नातेवाइकांना मदत जाहीर झाली असली तरी जखमींचे काय, हा प्रश्न उरतोच. जखमींना शासनाने एक लाख रुपये व संबंधित जबाबदार कंपनीनेही काही रक्कम देणे आवश्यक असून, ती मिळवून देणे आमच्यावर बंधनकारक आहे.
- आमदार शशिकांत शिंदे

Web Title: Speech only after Bothe's death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.