पंचकल्याणचा निधी शिक्षणावर खर्च करा, प. पू. स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजींचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2022 07:08 PM2022-05-14T19:08:00+5:302022-05-14T19:09:32+5:30
सांगलीत दक्षिण भारत जैन सभेच्या त्रैवार्षिक शंभराव्या अधिवेशनाचे उद्घाटन
सांगली : आण्णासाहेब लठ्ठे यांनी दक्षिण भारत जैन समाजाच्या माध्यमातून शिक्षणाची गंगोत्री ग्रामीण भागापर्यंत पोहोचविल्यामुळेच आज समाजाची प्रगती दिसत आहे. यापुढे समाजाने पंचकल्याण महोत्सवातील शिल्लक निधी शिक्षणावर खर्च करावा, असे आवाहन नांदणी संस्थान मठाचे प. पू. स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी यांनी केले.
सांगलीत दक्षिण भारत जैन सभेच्या त्रैवार्षिक शंभराव्या अधिवेशनाच्या उद्घाटन प्रसंगी जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी बोलत होते. दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष रावसाहेब (दादा) पाटील अध्यक्षस्थानी होते. अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार प्रकाश आवाडे, आमदार गीता जैन, माजी आमदार शरद पाटील, जैन सभेचे चेअरमन रावसाहेब पाटील, केंद्रीय उपाध्यक्ष भालचंद्र पाटील, उपाध्यक्ष दत्ता डोर्ले, माजी महापौर सुरेश पाटील, प्रा. एन. डी. बिरनाळे, सागर वडगावे, हेमंत लठ्ठे, डॉ. भरत लठ्ठे आदी प्रमुख उपस्थित होते.
जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी म्हणाले की, यापुढे शैक्षणिक कार्य वाढविण्याची गरज असून, समाजबांधवांनी पंचकल्याण महोत्सवातील शिल्लक निधी शैक्षणिक कार्यासाठी द्यावा. या कार्यासाठी माझे तुम्हाला आशीर्वाद असणार आहेत.
माजी आमदार शरद पाटील म्हणाले, जैन समाजातील विषमता दूर झाली पाहिजे. समाजाची सध्या परिस्थिती काय आणि किती समाज आहे हे पाहण्यासाठी जनगणना झाली पाहिजे.
डॉ. भरत लठ्ठे म्हणाले, आण्णासाहेब लठ्ठे यांनी तरुण वयात समाजाचे नेतृत्व करून जैन सभा सुरू केली. त्यांचे काम समाजाने उत्तमपणे पुढे नेले आहे.