फाळकुटदादांची शिरजोरी वाढली
By admin | Published: October 5, 2014 10:37 PM2014-10-05T22:37:45+5:302014-10-05T23:04:16+5:30
इस्लामपुरातील स्थिती : राजकीय गुंडांच्या दबावाखाली पोलीस
इस्लामपूर : इस्लामपूर शहर आणि परिसरात फाळकुटदादांची शिरजोरी वाढली आहे. या गुंडांना राजकीय गुंड खतपाणी घालत आहेत. त्यामुळे शहरात खंडणी, धमकावणे, भूखंड हडप करणे यामध्ये काही गुंड माहीर झाले आहेत. त्यांच्यावर कसलीही कारवाई होत नाही. पोलीसच राजकीय गुंडांच्या दबावाखाली असल्याचे चित्र आहे.
वारणा-कृष्णा खोऱ्यात वसलेल्या वाळवा तालुक्यात राजकीय गुंड चांगलेच फोफावले आहेत. वाळू माफिया, खासगी सावकारी आणि बिल्डरच्या विळख्यात सर्वसामान्य जनतेची लुबाडणूक होत आहे. या सर्वच माफियांनी पैशाच्या जोरावर आणि धाबा संस्कृतीने या फुटकळ गुंडांच्या अंगावर मास चढले आहे. यामुळे हे गुंड सर्रासपणे गावठी कट्टे व बेकायदेशीर शस्त्रांचा वापर करीत आहेत.
हे गुंड पोलिसांसमोरच वावरताना दिसतात. त्यांच्यावर कोणीही कारवाई करण्यास धजावत नाही. या तालुक्यातील आष्टा, कुरळप, कासेगाव या पोलीस ठाण्यांची अशीच परिस्थिती आहे. इस्लामपूर पोलीस ठाणे म्हणजे आर्थिक घडामोडींचे केंद्रच बनले आहे. या घडामोडीत काही अधिकाऱ्यांवर लाचलुचपत खात्याने कारवाईही केली आहे. तरीसुध्दा महसूल, नगरपरिषद आणि पोलीस खात्यात भ्रष्टाचार फोफावला असून, यामध्ये राजकीय नेत्यांचे सगेसोयरेच आहेत.
इस्लामपूर बसस्थानकाचा परिसर गुंडांचा केंद्रबिंदू आहे. सकाळी ७.३० ते दुपारी १२ या वेळेत ग्रामीण भागातून येणाऱ्या महाविद्यालयीन मुलींची छेडछाड करण्यात हे गुंड आघाडीवर असून, त्यांना महाविद्यालयीन युवकांची साथ मिळत आहे. त्यामुळे बसस्थानकाच्या पाठीमागील बाजूस आंबेडकर मार्गावरच हे युवक गुंडांना घेऊन वावरताना दिसतात. मध्यंतरीच्या काळात खासगी वेशातील पोलिसांनी अशा गुंडांवर कारवाई करण्याचे धोरण अवलंबले होते. सध्या मात्र ही कारवाई थंडावल्याने पुन्हा मागचे दिवस आले आहेत.
गेल्या ५ वर्षांपासून इस्लामपूर पोलीस ठाण्याला खमक्या अधिकारी भेटलेला नाही. जे जे अधिकारी आले ते ते मंत्र्यांच्या आणि पुढाऱ्यांच्या ताटाखालचे मांजर बनूनच राहिले. याच पुढाऱ्यांचे बगलबच्चे गुंडगिरी, खासगी सावकारी, बेकायदेशीर उद्योग करण्यात माहीर झाल्याने या तालुक्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढतच चालले आहे. (प्रतिनिधी)
छेडछाडीला ऊत
इस्लामपूर बसस्थानक परिसरात महाविद्यालयीन युवतींच्या छेडछाडीला ऊत आला आहे. पोलिसांनी मध्यंतरी कारवाई केली. त्यानंतर मात्र पोलीसही हतबल झाले आहेत.