Sangli Politics: इस्लामपूर-शिराळा मतदारसंघात कमळाबरोबर गेले घड्याळ, जयंत पाटील यांचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2024 06:47 PM2024-02-08T18:47:17+5:302024-02-08T18:50:40+5:30
२५ वर्षांनंतर दिग्गज नेत्यांची थांबली टिकटिक
अशोक पाटील
इस्लामपूर : इस्लामपूर-शिराळा मतदारसंघात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आमदार मानसिंगराव नाईक १९९९ पासून घड्याळ चिन्हावर राज्य करीत होते. त्यांचा राजकीय आलेख आजही चढताच आहे. मात्र, अजित पवार पक्ष आणि घड्याळासह भाजपमध्ये सामील झाल्याने दिग्गज नेत्यांच्या घड्याळाची टिकटिक गेल्या २५ वर्षांनंतर थांबली आहे.
राज्यात १९९९ साली शरद पवार यांनी राष्ट्रवादीची स्थापना केली. तेव्हापासून तत्कालीन मंत्री आमदार जयंत पाटील यांनी पवार यांचे नेतृत्व मानले. राष्ट्रवादी पक्षात विविध पदे भोगताना पक्षातील काहींची पाटील यांना अडथळेही आले. तरी सुद्धा जयंत पाटील यांनी पवार यांच्यावरील आपली निष्ठा ढळू दिली नाही. त्यांना शिराळा मतदारसंघात आमदार मानसिंगराव नाईक यांची साथही मोलाची ठरली.
तत्कालीन महाविकास आघाडीच्या राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सत्तेला त्यांच्याच पक्षातील एकनाथ शिंदे यांनी सुरुंग लावला. तेव्हापासून महाविकास आघाडीतील पक्षांना घरघर लागली. यादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीपासून फारकत घेऊन राष्ट्रवादीचाच दुसरा गट स्थापन केला. भाजपशी युती करून उपमुख्यमंत्रिपद मिळविले आणि राज्यात स्वत:च्या गटाचे अस्तित्व निर्माण करण्याचा डाव आखला आहे.
राज्यात अजित पवार यांच्या गटाची ताकद वाढवण्यासाठी विविध तालुक्यांत पदाधिकाऱ्यांची नवीन फाैज तैनात करण्यात आली. त्यातच पक्ष आणि चिन्हाच्या वादाचा निकाल अजित पवार यांच्या बाजूने लागल्याने राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांना मोठा धक्का बसला आहे. त्याचबरोबर आमदार जयंत पाटील यांचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात आले आहे. यावर जयंत पाटील आणि मानसिंगराव नाईक यांनी मौन पाळले असले तरी आगामी लोकसभा निवडणुकीनंतर जयंत पाटील यांची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याचे मानले जात आहे.
सध्यातरी दोन दिग्गज नेत्यांच्या घड्याळाची टिकटिक थांबली असली तरी जयंत पाटील यांच्या भूमिकेवर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू आहे. दुसरीकडे आमदार मानसिंगराव नाईक यांनीही गेल्या सहा महिन्यांतील राजकीय घडामोडींवर आपण काहीही बोलणार नाही, असा ठाम निर्णय घेतला आहे.
जयंत पाटील यांचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात
राज्यात अजित पवार यांच्या गटाची ताकद वाढवण्यासाठी विविध तालुक्यात पदाधिकाऱ्यांची नवीन फौज तैनात करण्यात आली. त्यातच पक्ष आणि चिन्हाच्या वादाचा निकाल अजित पवार यांच्या बाजूने लागल्याने राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांना मोठा धक्का बसला आहे. त्याचबरोबर आमदार जयंत पाटील यांचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात आले आहे.