जिल्ह्यात पावसाच्या तुरळक सरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:30 AM2021-07-14T04:30:43+5:302021-07-14T04:30:43+5:30
सांगली : जिल्ह्यात मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली. सोमवार (दि. १२)च्या तुलनेत जोर ओसरला असला तरी ढगांची ...
सांगली : जिल्ह्यात मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली. सोमवार (दि. १२)च्या तुलनेत जोर ओसरला असला तरी ढगांची दाटी कायम आहे. जिल्ह्यात सरासरी ७.८ मिलिमीटर पाऊस झाला.
गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. मंगळवारी सकाळपासून ढगांची दाटी होती. सकाळी ११ वाजता सांगली, मिरज शहरांत पावसाने हजेरी लावली. तासगाव, कवठेमहांकाळ तालुक्यातही तुरळक पाऊस झाला. मंगळवारी सकाळी नोंदल्या गेलेल्या आकडेवारीनुसार २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ७.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सर्वाधिक पाऊस तासगाव तालुक्यात ३० मि.मी. नोंदला गेला. मिरजेत २, खानापूर-विट्यात १, वाळवा-इस्लामपूरला ६.८, शिराळा तालुक्यात १८.४, आटपाडीत २.४, कवठेमहांकाळला ३.२, पलूसला ११.३, कडेगावमध्ये ०.७ मि. मी. पाऊस झाला.
भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या १७ जुलैपर्यंत जिल्ह्याच्या बहुतांश भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे. १८ व १९ जुलै रोजी पावसाचा जोर थोडा ओसरला आहे. पावसाची हजेरी मात्र आठ दिवस कायम राहणार आहे. या काळात तापमानात काहीअंशी घट होण्याची शक्यता आहे.
चौकट
कमाल तापमान घटले
जिल्ह्याचे कमाल तापमान मंगळवारी २५.६ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. किमान तापमान २१ अंश नोंदले गेले. तापमानात मोठी घट झाल्याने गारठा जाणवत आहे. कमाल तापमान सध्या जुलैच्या सरासरीपेक्षा ४ अंशांनी, तर किमान तापमान एक अंशाने कमी आहे.