प्रचार शिगेला : नेत्यांना वाघ, नाग आणि सागाची उपमा
By admin | Published: October 5, 2014 10:38 PM2014-10-05T22:38:58+5:302014-10-05T23:04:08+5:30
वाघ, नागाचे समीकरण असलेल्या या मतदारसंघात आता नव्याने काँग्रेसच्या सागाचे समीकरण
अशोक पाटील -इस्लामपूर - विधानसभा निवडणुकीत मतदानाला अवघे १० दिवस उरले आहेत. राज्यपातळीवर आघाडीची बिघाडी झाली, तर युतीचे तीनतेरा वाजले आहेत. त्यामुळे शिराळा मतदारसंघात राष्ट्रवादी, काँग्रेस आणि भाजपचे उमेदवार एकमेकांविरोधात उभे आहेत. तिघांचाही प्रचार शिगेला पोहोचला आहे. वाळवा-शिराळा सीमारेषेवर महामार्गावरील कणेगाव ते कासेगावदरम्यान असलेल्या गावांतून तिघांचेही राजकारण एकवटले आहे. वाघ, नागाचे समीकरण असलेल्या या मतदारसंघात आता नव्याने काँग्रेसच्या सागाचे समीकरण जोडले जाऊ लागले आहे.
या मतदारसंघात वाळवा तालुक्यातील ४८ गावांचा समावेश आहे. त्यामुळे ‘वाळव्याचा वाघ’ म्हणजे जयंत पाटील यांनी राजकारणातील स्थान टिकवून ठेवले आहेत. शिवाजीराव नाईक म्हणजेच शिराळ्याचा नाग. पाटील व नाईक यांच्यामधील संघर्ष नेहमीच चर्चिला जातो. त्यात आता नव्यानेच कोकरुड म्हणजे डोंगरी भागातील सागवानाची भर पडली आहे. ‘सागवान म्हणजे सत्यजित देशमुख’ असे नवीन समीकरण प्रचारसभेतून गाजू लागले आहे.
इस्लामपूर मतदारसंघात शांतता असली तरी, या वाळवा तालुक्यातील ४८ गावांत मात्र प्रचार शिगेला पोहोचला आहे. या प्रचाराचा केंद्रबिंदू पुणे-बेंगलोर महामार्गावरील कणेगाव ते कासेगावदरम्यान असलेली सर्व गावे बनली आहेत. कणेगाव, येलूर, इटकरे, येडेनिपाणी, कामेरी, पेठ, नेर्ले, कासेगाव ही गावे शिराळा मतदारसंघातील मोठी गावे आहेत. या गावांतील मतदारच शिराळ्याचा आमदार ठरवत असतात. त्यामुळे सर्वच पक्षांतील दिग्गज नेत्यांच्या सभा गाजू लागल्या आहेत. पहिल्या फेरीत काँग्रेसचे नारायण राणे यांनी कामेरी येथे सभा घेतली. याच गावात भाजपकडून नितीन गडकरी यांच्याही सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
शिराळा मतदारसंघावर जयंत पाटील यांचे वर्चस्व आहे. ते म्हणतील तोच आमदार, असे समीकरण असल्याचे मानले जाते. राष्ट्रवादीचे उमेदवार मानसिंगराव नाईक यांच्या पाठीशी ते आहेत. भाजपचे उमेदवार शिवाजीराव नाईक यांचे पानिपत करण्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे. त्यामुळेच याहीवेळी वाघ-नागाचा संघर्ष पहावयास मिळत आहे. त्यातच आता विधानपरिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांनी आणलेल्या निधीतून केलेल्या विकास कामांच्या ताकदीवर त्यांचे चिरंजीव सत्यजित देशमुख यांनी काँग्रेसतर्फे राष्ट्रवादी आणि भाजपपुढे आव्हान उभे केले आहे.
डोंगरी भागातील मुंबईचे मतदान खेचण्याचे प्रयत्न तिन्ही उमेदवारांकडून केले जात आहेत. मुंबई येथे जाऊन प्रचार सभाही घेण्यात आल्या आहेत. वाघ, नाग आणि सागाचे राजकारण चांगलेच रंगले असून, कार्यकर्त्यांसह मतदारांचा भाव वधारला आहे.
वाळव्यातील ४८ गावेच केंद्रबिंदू
प्रचाराच्या रणधुमाळीच्या पार्श्वभूमीवर इस्लामपूर मतदारसंघात सध्या शांतता असली तरी, या वाळवा तालुक्यातील ४८ गावांत मात्र प्रचार शिगेला पोहोचला आहे. या प्रचाराचा केंद्रबिंदू पुणे-बेंगलोर महामार्गावरील कणेगाव ते कासेगावदरम्यान असलेली सर्व गावे बनली आहेत. ही गावे शिराळ्याचा आमदार ठरवित असल्याने याच भागात दिग्गज नेत्यांच्या सभा गाजू लागल्या आहेत.