‘श्रीराम’च्या साखर व्यवस्थापकाची सांगलीत आत्महत्या
By admin | Published: January 16, 2017 12:30 AM2017-01-16T00:30:24+5:302017-01-16T00:30:24+5:30
‘श्रीराम’च्या साखर व्यवस्थापकाची सांगलीत आत्महत्या
सांगली : फलटण (जि. सातारा) येथील श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे निर्मिती व्यवस्थापक व मुख्य लेखाधिकारी सुनील गजानन पुजारी (वय ४९, रा. चिनार को-आॅप. हौसिंग सोसायटी, इचलकरंजी, जि. कोल्हापूर) यांनी सांगलीतील ‘तृप्ती’ लॉजमध्ये विष प्राशन करून आत्महत्या केली. शनिवारी सायंकाळी ही घटना उघडकीस आली. आत्महत्येपूर्वी पुजारी यांनी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना सापडली आहे.
सुनील पुजारी १३ जानेवारीला रात्री साडेनऊ वाजता मुख्य बसस्थानकाजवळील ‘तृप्ती’ लॉजमध्ये उतरले होते. त्यांना लॉजमधील नऊ क्रमांकाची खोली मिळाली होती. १४ जानेवारीला सकाळी नऊ वाजता स्वच्छता कर्मचारी त्यांच्या खोलीची स्वच्छता करण्यासाठी गेला होता. कर्मचाऱ्याने खोलीचा दरवाजा ठोठावला; पण आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. पुजारी कदाचित झोपले असतील, असा अंदाज बांधून कर्मचारी निघून गेला. दुपारी चार वाजता तोच कर्मचारी पुन्हा खोलीच्या स्वच्छतेसाठी गेला. तेव्हाही पुजारी यांनी दरवाजा उघडला नाही.
कर्मचाऱ्याने हा प्रकार लॉजचे व्यवस्थापक संतोष केरेकर यांना सांगितला. केरेकर सायंकाळी साडेपाच वाजता खोलीकडे गेले. त्यांनीही पुजारी यांना हाक मारली. अर्धा तास ते पुजारी यांना उठविण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र, पुजारी यांचा आतून आवाजही आला नाही. शेवटी शहर पोलिसांना पाचारण करण्यात आले. खोलीचा दरवाजा मोडण्यात आला. त्यावेळी पुजारी खाटावरून खाली मृतावस्थेत पडल्याचे आढळून आले. त्यांच्या जवळच विषारी औषध होते.
पुजारी यांनी लॉजच्या रेकॉर्डमध्ये स्वत:चे नाव बरोबर लिहिले होते; पण पत्ता रामनगर, ब्राह्मण गल्ली, फलटण असा लिहिला आहे. त्यांच्याजवळील कागदपत्रांत वाहन परवाना सापडला. यावरून ते इचलकरंजीचे रहिवासी असल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्या नातेवाइकांशी संपर्क साधून या घटनेची माहिती देण्यात आली. आत्महत्या करण्यापूर्वी पुजारी यांनी लिहिलेली चिठ्ठी सापडली आहे. पोलिसांनी ही खोली सध्या सील केली आहे. लॉजमधील ग्राहकांच्या नोंदीचे रेकॉर्डही ताब्यात घेतले आहे. लॉजचे व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांकडे पोलिसांनी चौकशी केली. या चौकशीतून पुजारी एकटेच लॉजमध्ये उतरले होते. १३ जानेवारीला खोलीत गेल्यानंतर ते पुन्हा बाहेर आलेच नाहीत, अशी माहिती चौकशीतून पुढे आली आहे. सांगलीच्या शासकीय रुग्णालयात विच्छेदन तपासणी करून रात्री उशिरा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. (प्रतिनिधी)
‘चिठ्ठी’तील मजकूर : पोलिसांची गोपनीयता
पुजारी यांनी चिठ्ठीत लिहिलेल्या मजकुराबाबत शहर पोलिसांनी कमालीची गोपनीयता बाळगली आहे. चिठ्ठीत त्यांनी काय लिहिले आहे, याबाबत विचारणा केली; पण पोलिसांनी अत्यंत गोपनीय आहे. ते सांगता येणार नाही, असे सांगितले. पुजारी यांनी सांगलीत लॉजमध्ये जाऊन आत्महत्या केल्याने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे त्यांच्या आत्महत्येविषयी गूढ निर्माण झाले आहे. त्यांचे नातेवाईक चिठ्ठीतील मजकुराची माहिती घेऊन पुढील कार्यवाही करणार असल्याचे समजते.
सांगलीत स्थायिक
पुजारी वाणिज्य शाखेचे पदवीधर होते. हुपरी (जि. कोल्हापूर) येथील जवाहर साखर कारखान्याकडे लेखाधिकारी म्हणून सेवेत होते. जवाहर साखर कारखान्याने फलटण येथील श्रीराम साखर कारखाना चालविण्यास घेतला आहे. या कारखान्याकडे पुजारी यांची निर्मिती व्यवस्थापक म्हणून नियुक्ती झाली होती. मुलांच्या शिक्षणासाठी ते आपल्या कुटुंबासह सांगलीतील विश्रामबाग येथे स्थायिक झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, मुलगा, आई-वडील, दोन भाऊ, भावजयी असा परिवार आहे.