Sangli: बस माहिती नव्हती ज्या गावाला, तिथे आता दहा बसेस दिमतीला
By अविनाश कोळी | Published: August 22, 2023 04:48 PM2023-08-22T16:48:36+5:302023-08-22T16:49:53+5:30
पायपीट थांबली : ग्रामस्थ, विद्यार्थ्यांना मिळाला मोठा दिलासा
कोकरुड : बसअभावी ज्या गावात विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिकांना दररोज पाच ते सहा किलोमीटर पायपीट करावी लागत होती. त्याच गावात आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर, सततच्या पाठपुराव्याने आता तब्बल दहा बसेस सुरू झाल्या आहेत.
गिरजवडे गाव जोतिबा देवस्थानसाठी प्रसिद्ध आहे. दरवर्षी येथे लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. मात्र, या गावाला कोणत्याही आगाराची बस येत नव्हती. त्यामुळे शिराळा, कासेगाव, इस्लामपूर येथे शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक यांच्यासमोर अडचणींचा बांध तयार झाला हाेता. बससाठी पाच ते सहा किलोमीटर पायपीट करून जावे लागत होते.
मुली आणि स्त्रिया यांच्यासाठी ही कसरत होती. प्रसिद्ध देवस्थान असतानाही भाविकांना पायी चालत जावे लागत होते. लोकनियुक्त सरपंच सचिन देसाई यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी शिराळा, इस्लामपूर आगाराकडे पाठपुरावा केला. मात्र, त्यांना यश आले नाही. शेवटी शाळा, कॉलेजची मुले, प्रवासी यांना घेऊन इस्लामपूर आगारात आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. आंदोलनाचा हा मंत्र कामी आला. त्याची दखल घेत महामंडळ प्रशासन जागे झाले. शिराळा आणि इस्लामपूर आगाराने उत्तर भागात जाणाऱ्या सर्व एसटी बस गिरजवडेमार्गे चालू केल्यामुळे विद्यार्थी व ग्रामस्थांना दिलासा मिळाला.
आगाराला मिळाला पैका
बससेवेची ही कहाणी इथेच थांबली नाही. गावात भाविकांच्या वाढत्या संख्येमुळे दोन्ही आगारही फायद्यात आले आहेत. प्रवाशांची संख्या पाहून एक, दोन करीत आगारांनी या गावात तब्बल दहा बसफेऱ्या सुरू केल्या. ग्रामस्थांच्या वतीने याबद्दल समाधान व्यक्त करतानाच सरपंच देसाई यांचा यासाठी सत्कारही केला.