Sangli: व्हिडिओ व्हायरल करीत एसटी वाहकाने पलूसमध्ये संपवले जीवन, तीन अधिकारी निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2024 12:40 PM2024-10-14T12:40:56+5:302024-10-14T12:41:18+5:30

मूळचा पुणे जिल्ह्यातील, तपासणी अधिकाऱ्यांनी चुकीची कारवाई केल्याचा आरोप

ST carrier ends life in Palus after viral video in Sangli, three officials suspended | Sangli: व्हिडिओ व्हायरल करीत एसटी वाहकाने पलूसमध्ये संपवले जीवन, तीन अधिकारी निलंबित

Sangli: व्हिडिओ व्हायरल करीत एसटी वाहकाने पलूसमध्ये संपवले जीवन, तीन अधिकारी निलंबित

पलूस : पलूस एसटी आगारातील वाहक दुशांत गंगाराम बुळे (वय ३४, रा.थांबूळ गवान, ता.जुन्नर, जि.पुणे. सध्या रा.कोयना वसाहत, पलूस) यांनी राहत्या घरी आत्महत्या केली. तिकीट तपासणी अधिकाऱ्याच्या खोट्या कारवाईमुळे आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी व चित्रफीत त्यांनी आत्महत्येपूर्वी तयार करुन ती व्हायरल केली आहे.

दरम्यान, याची गंभीर दखल घेत, तिघा अधिकाऱ्यांना प्रशासनाने तातडीने निलंबित केले आहे. सहायक वाहतूक निरीक्षक जयदेव भास्कर सांतुरकर, वाहतूक नियंत्रक हणमंत रामचंद्र खरमाटे आणि तपासणी पथकातील चालक मोहन विजय कल्याणकर अशी निलंबित अधिकारी व कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

बुळे यांच्या आरोपांची चित्रफीत सर्वत्र व्हायरल झाली आहे. शनिवारी रात्री नऊच्या सुमारास त्यांनी आत्महत्या केली. या संदर्भात त्यांचा भाऊ जालिंदर बुळे यांनी पलूस पोलिसांत फिर्याद दिली. दुशांत हे शनिवारी सकाळी साडेआठ वाजता कराड ते जत बसमध्ये ड्युटीवर होते. ही बस तासगाव स्थानकात आली असता, तिकीट तपासणी अधिकाऱ्यांनी तपासणी केली, तेव्हा एका प्रवासी महिलेकडे अमृत योजनेचे चुकीचे तिकीट आढळले.

बुळे यांनी महिलेला अर्धे तिकीट व अन्य एका ज्येष्ठ नागरिक प्रवाशाला अमृत योजनेचे तिकीट दिले होते. त्या दोहोंनी तिकिटांची अदलाबदल केली होती. संबंधित ज्येष्ठ नागरिक अगोदरच्या थांब्यावर उतरून गेला. महिला प्रवाशाचे तिकीट त्याच्यासोबतच होते. तपासनीसांनी तिकिटे तपासली, तेव्हा महिलेकडे अमृत योजनेचे तिकीट आढळले. त्यामुळे पथकाने कारवाईचा निर्णय घेतला.

बुळे यांनी मशिन तपासून कारवाई करा, अशी विनंती पथकाला केली. मात्र, तपासणी अधिकाऱ्यांनी खोट्या प्रवाशाचे नाव टाकून कारवाई केल्याची तक्रार बुळे यांनी केली. निराश झालेल्या बुळे यांनी घरी गेल्यानंतर सायंकाळी चित्रफीत बनवली. कारवाईचा जाब विचारत एक चित्रफीत बनवून समाजमाध्यमांवर व्हायरल केली. खोटी कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांना सोडू नका, असे त्यांनी चित्रफितीत म्हटले आहे. त्यानंतर, दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. तत्पूर्वी त्यांनी तपासणीच्या कार्यवाहीचे चित्रीकरण मोबाइलवर केले व स्टेटसला ठेवले होते. पोलिसांना पंचनाम्याच्या वेळी चिठ्ठीही सापडली.

बुळे यांच्या कुटुंबावर संकट

गेल्याच वर्षी बुळे यांच्या पत्नीचे कर्करोगाने निधन झाले होते. या दाम्पत्याला सात आणि दोन वर्षे वयाच्या दोन लहान मुली आहेत. आई-वडिलांच्या निधनाने त्यांच्यावरील छत्रछाया हरपली आहे.

Web Title: ST carrier ends life in Palus after viral video in Sangli, three officials suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.