एसटी चालकास बेदम मारहाण

By admin | Published: July 10, 2017 12:39 AM2017-07-10T00:39:53+5:302017-07-10T00:39:53+5:30

एसटी चालकास बेदम मारहाण

ST driver aback | एसटी चालकास बेदम मारहाण

एसटी चालकास बेदम मारहाण

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात एसटी चालकाने रस्त्याकडेला दाबण्याचा प्रयत्न केल्याने, संतप्त झालेल्या हुजेब असल पन्हाळकर (वय २२, रा. रामनगर, कोल्हापूर रस्ता, सांगली) याने व त्याच्या एका मित्राने एसटी चालक उमाजी यशवंत बाबर (३५) यांना बेदम मारहाण केली. निमशिरगाव (ता. हातकणंगले) येथे दुपारी दोन वाजता ही घटना घडली.
प्रवाशांनी मध्यस्थी केल्याने निमशिरगावमध्ये हा वाद मिटला; पण एसटी सांगली बसस्थानकात आल्यानंतर पन्हाळकर व त्याच्या दहा ते बारा मित्रांनी हातात नंग्या तलवारी व काठ्या घेऊन धिंगाणा घातला. चालक बाबर स्थानकातीत कार्यालयात बसले होते, त्यावेळी पन्हाळकरसह त्याच्या मित्रांनी या कार्यालयात घुसून त्यांना पुन्हा बेदम मारहाण केली. यामध्ये त्यांच्या छातीच्या तीन बरगड्या मोडल्या आहेत. त्यांच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
या घटनेमुळे प्रचंड तणाव निर्माण झाला होता. पोलीस येतील या भीतीने पन्हाळकर व त्याचे मित्र पळून गेले. त्यानंतर बाबर यांना उपचारार्थ रुग्णालयात हलविले. घटनेची माहिती मिळताच एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रुग्णालयाकडे धाव घेतली.
ओव्हटेकमुळे वाद
चालक उमाजी बाबर सांगली एसटी आगारात सेवेत आहेत. रविवारी त्यांची सांगली-कोल्हापूर या ‘नॉनस्टॉप’ बसवर ड्युटी होती. दुपारी साडेबारा वाजता ते कोल्हापुरातून बस घेऊन सांगलीकडे येण्यास निघाले होते. निमशिरगावजवळ आल्यानंतर पन्हाळकर व त्याचा मित्र दुचाकीवरून याच मार्गावरून सांगलीला येत होते. पन्हाळकरने त्यांच्या एसटीला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. याचवेळी समोरून एक मोठे वाहन आल्याने चालक बाबर यांनी ब्रेक मारून एसटी कडेला घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पन्हाळकर दुचाकीसह रस्त्याकडेला दाबला गेला. त्यानंतर त्याने पाठलाग करून एसटी थांबविली व चालक बाबर यांना एसटीतून बाहेर ओढून बेदम मारहाण केली. प्रवाशांनी मध्यस्थी केल्यानंतर पन्हाळकर गप्प बसला व एसटी सांगलीकडे निघाली. त्यानंतर पन्हाळकरने पुन्हा एसटीचा पाठलाग सुरू केला. फोनाफोनी करून त्याने मित्रांना सांगलीच्या स्थानकावर बोलावले. बाबर एसटी घेऊन सांगली स्थानकावर दीड वाजता आले. त्यानंतर चालक बाबर स्थानकातील कार्यालयात बसले होते. त्यावेळी पन्हाळकर व त्याचे मित्र नंग्या तलवारी व काठ्या घेऊन तिथे आले. स्थानकात बराचवेळ त्यांनी धिंगाणा घातला. प्रवाशांची पळापळ झाली. त्यांनी कार्यालयात घुसून बाबर यांना पुन्हा बेदम मारहाण केली.
पोलिसांना कळविले असते तर..
चालक बाबर यांना भररस्त्यावर मारहाण झाली. सांगलीत एसटीच्या कार्यालयात घुसूनही मारहाण झाली. स्थानकावरील चौकीत पोलीसच नव्हते. त्यामुळे पन्हाळकर व त्याच्या मित्रांनी कार्यालयात घुसून एका एसटी कर्मचाऱ्याला मारहाण करण्याचे धाडस केले. निमशिरगावमध्ये बाबर यांना मारहाण झाल्यानंतर त्याचवेळी आगार व्यवस्थापनाने शहर पोलीस ठाण्याला याची माहिती दिली असती तर पुढील प्रकार टळला असता.

Web Title: ST driver aback

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.