एसटीला मालवाहतुकीतून ६७ लाखांवर उत्पन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:27 AM2021-05-08T04:27:32+5:302021-05-08T04:27:32+5:30
सांगली : कोरोनाच्या संकटात एसटीची शंभर टक्के प्रवासी वाहतूक ठप्प झाली आहे. मात्र, मालवाहतुकीचा मोठा आधार मिळाला आहे. दोन ...
सांगली : कोरोनाच्या संकटात एसटीची शंभर टक्के प्रवासी वाहतूक ठप्प झाली आहे. मात्र, मालवाहतुकीचा मोठा आधार मिळाला आहे. दोन महिन्यांत सांगली विभागाला ६७ लाख ४४ हजार ८०४ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. रासायनिक खते, शेतीमाल, सिमेंट वाहतुकीसाठी एसटीच्या मालवाहतूक सेवेचा वापर होत आहे.
कोरोनामुळे वर्षभरापासून एसटीची प्रवासी वाहतूक कोलमडली आहे. गेल्या वर्षी तर मार्चपासून सहा महिने प्रवासी वाहतूक सुरळीत न झाल्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगारही वेळेवर झाले नव्हते. अखेर एसटी महामंडळाने प्रवासी वाहतुकीला पर्याय म्हणून मालवाहतुकीचा पर्याय निवडला. सांगली विभागातील दहा आगारांकडील जुन्या ४३ बसेसमध्ये किरकोळ बदल करून त्या मालवाहतुकीसाठी चालविल्या जात आहेत. सुरुवातील मालवाहतुकीला फारसा प्रतिसाद नव्हता, पण सध्या मार्च, २०२१ महिन्यात दहा आगारांतील एसटीच्या ४३ मालवाहतूक बसेसनी ५१५ फेऱ्या करून ७७ हजार ८५४ किलोमीटरचा प्रवास केला. यामुळे ३५ लाख ४१ हजार ६९३ रुपयांचे उत्पन्न मिळाले. इस्लापूपर, सांगली, मिरज, तासगाव, विटा, जत आगारांनी सर्वाधिक उत्पन्न मिळविले आहे.
एप्रिल महिन्यात लॉकडाऊन केल्यामुळे प्रवासी वाहतूक जवळपास बंदच झाली होती. या संकटकाळात एसटी मालवातूक मात्र जोरात चालू होती. ४३ बसेसनी ४५७ फेऱ्या करून ६८ हजार १०२ किलोमीटरचा प्रवास करून ३२ लाख तीन हजार १११ रुपयांचे उत्पन्न मिळविले.
चौकट
एसटीचे आगारनिहाय एप्रिल महिन्याचे उत्पन्न
आगार फेऱ्या उत्पन्न
सांगली ८१ ५४४१८०
मिरज ४३ २५७८१०
इस्लामपूर ९१ ७५२६४०
तासगाव ४७ ४११०४५
विटा २५ १९६७००
जत ८५ ४४२७४०
आटपाडी १२ ६९७७२
क.महांकाळ १० ६४६५६
शिराळा ३० १९५८४३
पलुस ३३ २६७७२५
एकूण ४५७ ३२०३१११
कोट
एसटीची प्रवासी वाहतूक शंभर टक्के बंद असल्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार भागविण्याचा प्रश्न गंभीर निर्माण झाला आहे. शासनाकडून पैसे आल्यावरच पगार होणार आहे. या कठीण परिस्थितीमध्ये मालवातुकीपासून उत्पन्न मिळत असून, तोच आमचा मोठा आधार आहे.
- अरुण वाघाटे, विभाग नियंत्रक, सांगली विभाग