बदली होत नसल्याने एसटी कर्मचाऱ्याने संपवले जीवन, सांगली जिल्ह्यातील प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2024 05:06 PM2024-09-20T17:06:32+5:302024-09-20T17:07:02+5:30

आगारप्रमुखावर कारवाईची मागणी

ST employee ends his life as there is no transfer in Sangli district | बदली होत नसल्याने एसटी कर्मचाऱ्याने संपवले जीवन, सांगली जिल्ह्यातील प्रकार

बदली होत नसल्याने एसटी कर्मचाऱ्याने संपवले जीवन, सांगली जिल्ह्यातील प्रकार

मिरज : कवठेमहांकाळ एसटी आगारातील सहायक जावेद अल्लाबक्ष नगारजी (वय ३८, रा. जत) या एसटी कर्मचाऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली. आगार व्यवस्थापकांनी बदलीचा अर्ज अडवून ठेवल्याने आत्महत्या करीत असल्याचे नगारजी यांनी जिल्हा नियंत्रकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. याप्रकरणी संबंधित एसटी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा संतप्त नातेवाइकांनी घेतला होता.

जावेद नगारजी हे कवठेमहंकाळ एसटी आगारात कार्यशाळेत सहायक म्हणून काम करीत होते. अडीच वर्षांपूर्वी नगारजी यांची जत येथून कवठेमहांकाळ येथे बदली झाली होती. बदलीमुळे नाराज झालेल्या नगारजी यांनी जत येथे पुन्हा बदलीसाठी कवठेमहांकाळ आगारप्रमुख महेश जाधव यांच्याकडे दोनवेळा विनंती अर्ज केले होते.

मात्र, दिलेले अर्ज जिल्हा नियंत्रकांकडे पाठविले नसल्याने बदली होत नसल्याची नगारजी यांची तक्रार होती. त्यातच आगारप्रमुख व हेड मेकॅनिक यानी नगारजी यांना आठ दिवस निलंबित केले होते. त्यामुळे ते अस्वस्थ होते. त्यांनी दि. १६ रोजी एसटी जिल्हा नियंत्रकांकडे अर्ज केला होता. त्यात माझ्या बदलीसाठी केलेला अर्ज आपल्याकडे पाठविला नसल्याची व आगारातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून वारंवार शारीरिक, मानसिक व आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. या कारणामुळे आत्महत्या करणार आहे. मला न्याय मिळावा, असे म्हटले आहे. 

या अर्जाच्या प्रति नगारजी यांनी काही मित्रांना पाठविल्या. रविवारी कवठेमहांकाळ आगारात येऊन विष प्राशन केले. नगारजी यांना मिरज सिव्हिलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना गुरुवारी त्यांचा मृत्यू झाला. नगारजी यांच्या मृत्यूमुळे संतप्त नातेवाइकांनी संबंधित एसटी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा घेतला. जावेद नगारजी यांच्या आत्महत्येचे वृत्त समजतात एसटी कर्मचारी व भीम आर्मीचे जैलाब शेख यांनी सिव्हिलमध्ये धाव घेतली. नगारजी यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

Web Title: ST employee ends his life as there is no transfer in Sangli district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.