एसटी कर्मचारी म्हणतात... स्वेच्छानिवृत्ती? नको रे बाबा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:26 AM2020-12-22T04:26:08+5:302020-12-22T04:26:08+5:30
एसटीच्या सांगली विभागासाठी ५८३० अधिकारी, कर्मचाऱ्यांची पदे मंजूर आहेत. त्यापैकी रोजंदार वर्ग एकचे २५९, रोजंदार वर्ग दोनचे ७४ आणि ...
एसटीच्या सांगली विभागासाठी ५८३० अधिकारी, कर्मचाऱ्यांची पदे मंजूर आहेत. त्यापैकी रोजंदार वर्ग एकचे २५९, रोजंदार वर्ग दोनचे ७४ आणि नियमित अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या ४१२५, अशी कार्यरत कर्मचारी, अधिकाऱ्यांची संख्या आहे. स्वेच्छानिवृत्ती योजना वय वर्षे ५० व त्यापेक्षा जास्त वयाच्या एसटी कर्मचारी व अधिकारी यांना लागू केली आहे. अशा कर्मचाऱ्यांची संख्या ८५० आहे. त्यापैकी शुक्रवार, दि. १९ डिसेंबरअखेर ८१ कर्मचारी, अधिकाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केला आहे. स्वेच्छानिवृत्तीसाठी एसटी प्रशासनाकडे अर्ज सादर करण्याची मुदत दि. २४ डिसेंबर आहे. एसटीकडे पगाराची ओरड असतानाही अधिकारी, कर्मचाऱ्यांचा स्वेच्छानिवृत्तीसाठी थंडा प्रतिसाद दिसत आहे. अनेक कर्मचाऱ्यांवर कुटुंबीयांची जबाबदारी असल्यामुळे त्यांच्या मनामध्ये स्वेच्छानिवृत्तीबाबत भीती आहे.
चौकट
दोन वर्षापासून सेवानिवृत्तांचे १८ कोटी थकीत
जुलै २०१८ मध्ये सांगली विभागातून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे १८ कोटी एसटी महामंडळ देणार आहे. तेच अद्याप मिळाले नसतील, तर स्वेच्छानिवृत्तीनंतरची सर्व देणी एकरकमी मिळणार आहेत का, असा प्रश्न कर्मचाऱ्यांच्या मनात आहे. स्वेच्छानिवृत्ती घेणाऱ्यांना सहा महिन्यांचा पगार मिळावा, त्यांच्या वारसांना पात्रतेनुसार अनुकंपा नोकरीची संधी द्यावी, आदी मागण्यांचा विचार करण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया एसटी कर्मचारी संघटनेचे विभागीय अध्यक्ष अशोक खोत यांनी दिली.