एसटी कर्मचारी १५ मे नंतर संपावर
By admin | Published: April 24, 2017 12:04 AM2017-04-24T00:04:55+5:302017-04-24T00:04:55+5:30
राज्य अधिवेशनात ठराव; मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीचे चंद्रकांतदादांचे आश्वासन
मिरज : एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतन वाढीसह सर्व मागण्यांबाबत निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री व परिवहन मंत्र्यांसोबत बैठक घेण्याचे आश्वासन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी एसटी कामगारांच्या मिरजेतील राज्य अधिवेशनात दिले. तरीही वेतनवाढीच्या प्रश्नावर १५ मे नंतर संपावर जाण्याचा इशारा एसटी कामगार संघटनेने दिला. तसा ठरावही करण्यात आला.
एसटी कर्मचाऱ्यांचे राज्यस्तरीय अधिवेशन सांगली-मिरज रस्त्यावरील चंदनवाडी येथे भाऊ फाटक व क. ब. अय्यरनगरीत पार पडले. अधिवेशनास राज्यातून हजारो एस.टी. कर्मचारी उपस्थित होते. एसटी कर्मचाऱ्यांसाठी सातव्या वेतन आयोगाच्या मागणीबाबत चंद्रकांत पाटील म्हणाले, एसटीचा महाराष्ट्राच्या विकासात मोठा वाटा आहे. राज्यातील ४३ हजार गावांपर्यंत जाणाऱ्या एसटीला सर्वसामान्यांच्या जीवनात महत्त्वाचे स्थान आहे. कमी पगार, अपुऱ्या सुविधा व मागण्या प्रलंबित असतानाही एसटी कर्मचारी प्रामाणिकपणे सेवा बजावीत आहेत. मी कामगाराचा मुलगा असल्याने मला एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्यांची जाणीव आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतन वाढीसह सर्व मागण्यांबाबत मी एसटी कर्मचाऱ्यांसोबत आहे. मागण्यांबाबत एकत्र बसून चर्चेने मार्ग काढता येणे शक्य आहे. वेतन वाढीसह अन्य मागण्यांबाबत मुख्यमंत्री व परिवहन मंत्र्यांसोबत बैठक घेऊ, असे आश्वासनही चंद्रकांत पाटील यांनी दिले.
ते म्हणाले, एसटी महामंडळाचे शेकडो कोटी रुपये शासनाकडून द्यायचे आहेत. यासाठी यावर्षी बजेटमध्ये तरतूद करण्यात आली आहे. राज्यातील खासगी ट्रॅव्हल्स व्यवसाय फायद्यात आहे. मग एसटी नेहमी तोट्यात का? याचाही विचार झाला पाहिजे.
कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले, एसटी कामगारांची सातव्या वेतन आयोगाची मागणी योग्य आहे. शासन सेवेत सामावून घेण्यासाठी एसटी कामगारांच्या सुरू असलेल्या संघर्षाची शासनाने दखल घ्यावी. यापूर्वी आघाडी शासनाने एसटी कामगारांकडे दुर्लक्ष केले. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत युती शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल.
संघटनेचे सरचिटणीस हनुमंत ताटे म्हणाले, गतवर्षी नागपूर अधिवेशनात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसोबत एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग देण्याच्या आश्वासनाची मुख्यमंत्र्यांनी पूर्तता करावी, एसटी महामंडळ शासनात विलीन करून शासकीय कर्मचारी व एसटी कर्मचाऱ्यांतील वेतन तफावत दूर करावी, एसटीच्या आर्थिक परिस्थितीमुळे कर्मचाऱ्यांच्या वेतन वाढीला मर्यादा घालण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी संघटनेसोबत बैठक घेऊन वेतन वाढीची समस्या सोडवावी.
संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे म्हणाले, एसटी आर्थिक अडचणीत येण्यास कर्मचारी कारणीभूत नसतानाही, कर्मचाऱ्यांना वेतनवाढीपासून वंचित ठेवण्यात आले आहे. एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा व वेतन देऊन महामंडळाच्या जोखडातून मुक्त करा, एसटी कामगारांनाही अच्छे दिन आले पाहिजेत. विलास यादव यांनी स्वागत केले. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते एसटी कर्मचारी संघटनेच्या स्मरणिकेचे व ज्येष्ठ नेते बिराज साळुंखे यांच्या कार्यावर आधारित अॅड. के. डी. शिंदे यांनी लिहिलेल्या ‘वन- मॅन आर्मी’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. महापौर हारुण शिकलगार, इस्लामपूरचे नगराध्यक्ष शशिकांत पाटील, आ. सुरेश खाडे, आ. सुधीर गाडगीळ, आ. शिवाजीराव नाईक, भाजप जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, माजी मंत्री प्रतीक पाटील, माजी महापौर किशोर जामदार, संघटनेचे कार्याध्यक्ष सदाशिव शिवणकर, कोषाध्यक्ष अनिल श्रावणे यांच्यासह पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
मी साधा, पण हुशार राजकारणी
मी साधा, मात्र हुशार राजकारणी आहे. माझ्याकडे परिवहन खाते नाही, मात्र मुख्यमंत्र्यांचा प्रतिनिधी म्हणून मी अधिवेशनास उपस्थित आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण होण्यासाठी परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्यासोबत असलेली मैत्री पणाला लावेन. टप्प्या-टप्प्याने तुमच्या मागण्या पदरात पाडून घ्या, असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितल