बाईपण भारी देवा, महिलांच्या गर्दीने लालपरीला उत्पन्नाचा मेवा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2024 16:10 IST2024-08-13T16:10:08+5:302024-08-13T16:10:23+5:30
सांगली जिल्ह्यात चार महिन्यांत सव्वा कोटी महिलांचा एसटी प्रवास

बाईपण भारी देवा, महिलांच्या गर्दीने लालपरीला उत्पन्नाचा मेवा
सांगली : एसटी प्रवासात अर्ध्या तिकिटाची सवलत मिळाल्याने महिलांनी विक्रमच केला आहे. जिल्ह्याच्या लोकसंख्येपेक्षा जास्त महिलांनी जुलै महिन्यांत एसटी प्रवास करीत महामंडळाच्या तिजोरीत भरभरून उत्पन्न टाकले आहे.
जुलै महिन्यात तब्बल ३२ लाख ९५ हजार ४५० महिलांनी एसटी प्रवास केला आहे. महिला सन्मान योजनेतून त्यांना अर्ध्या तिकिटात प्रवासाचा लाभ महामंडळाने दिला आहे. जिल्ह्यातील लोकसंख्या ३१ लाख आहे. म्हणजे लोकसंख्येपेक्षा जास्त महिलांनी एसटीतून प्रवासाचा विक्रम केला आहे. याच काळात २ लाख ६५ हजार ४२२ ज्येष्ठ नागरिकांनी सवलतीच्या तिकिटात प्रवास केला, तर ७५ वर्षांवरील ७ लाख ९२ हजार ७५६ आजोबांनी मोफत प्रवासाचा लाभ घेतला.
एसटीतून प्रवासासाठी सवलत योजना जाहीर झाल्यापासून गर्दी वाढू लागली असून महिलांचा प्रतिसाद भरभरून असल्याचे दिसत आहे. त्या अर्ध्या तिकिटात प्रवास करीत असल्या, तरी उर्वरित परतावा शासनाकडून मिळतो. त्यामुळे एसटीला फायदा होत आहे. शहरी बसलादेखील अर्ध्या तिकिटात प्रवासाची सुविधा लागू केल्याने महापालिका क्षेत्रातही महिलांचे भारमान वाढले आहे. त्याचा फटका वडाप वाहतुकीला बसत आहे.
उत्पन्नाचा नवा विक्रम
एप्रिल ते जुलै या चार महिन्यांत तब्बल एक कोटी ३३ लाख ५७ हजार ५३० महिला एसटीकडे वळल्या. एप्रिलमध्ये ३१ लाख ३२ हजार ५६६, मे महिन्यात ३६ लाख २ हजार ३१६, जूनमध्ये ३३ लाख २७ हजार १९८ महिलांनी एसटीतून प्रवास केला. त्यांच्या अर्ध्या तिकिटाच्या सवलतीपोटी शासनाकडून तब्बल ३२ कोटी ८० लाख ५९ हजार २९९ रुपये मिळाले. उत्पन्नाचा हा एक विक्रमच ठरला आहे.
महिला सन्मान योजनेला जिल्हाभरात चांगला प्रतिसाद मिळत असून उत्पन्नातही वाढ झाली आहे. एप्रिलपासूनच्या चार महिन्यांत सव्वा कोटीहून महिलांनी एसटीतून प्रवास केला. त्याशिवाय अन्य सवलत योजनांनाही प्रतिसाद आहे. श्रावण महिन्यात विविध आगारांनी तीर्थक्षेत्री प्रवासाच्या योजना सुरू केल्या असून प्रवाशांनी त्याचा लाभ घ्यावा. - वृषाली भोसले, विभागीय वाहतूक अधिकारी