एसटी खड्ड्यांत; नऊ गावांच्या फेऱ्या बंदच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:33 AM2021-09-07T04:33:05+5:302021-09-07T04:33:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : पावसाळ्यामुळे जिल्ह्यातील नऊ रस्त्यांची चाळण झाली आहे. याचा फटका एसटी महामंडळालाही बसत आहेत. एसटी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : पावसाळ्यामुळे जिल्ह्यातील नऊ रस्त्यांची चाळण झाली आहे. याचा फटका एसटी महामंडळालाही बसत आहेत. एसटी महामंडळाने या खड्ड्यांमुळे नऊ गावांची वाहतूक बंद केली असून अनेक ठिकाणी इतर मार्गाने वळविली आहे. एसटीचा मेंटेनन्स वाढल्यामुळे एसटी महामंडळाच्या प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. परंतु, या निर्णयामुळे प्रवाशांची गैरसोय होत असल्यामुळे विद्यार्थ्यांसह नागरिकांमधून नाराजीचा सूर आहे.
कोरोनामुळे एसटी महामंडळ आर्थिक संकटात असताना खड्ड्यांचाही फटका बसत आहे. अतिवृष्टी झाल्यामुळे वाळवा, पलूस, शिराळा, कडेगाव, मिरज आणि जत तालुक्यांतील रस्ते खराब झाले आहेत. काही रस्त्यांची देखभाल दुरुस्तीच न केल्यामुळे तेथील रस्ते खराब झाले आहेत. यामुळे या मार्गावरून बसेस चालवितांना चालकाला कसरत करावी लागत आहे. एसटी कर्मचारी संघटनांसह प्रशासनानेही मोठ्या प्रमाणात खड्डे असलेल्या मार्गावर बसेस न सोडण्याचा निर्णय घेतला आहे. एसटी प्रशासनाच्या या निर्णयामुळे नऊ मार्गांवरील प्रवासी आणि शाळेला बसने जाणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. यामुळे बांधकाम विभागाने रस्त्यांची तत्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
चौकट
या मार्गांवरील फेऱ्या बंद
सांगली - इस्लामपूर
इस्लामपूर - कडेगाव
इस्लामपूर - नागठाणे
सांगली - वाळवा
शिराळा - खुंदलापूर
शिराळा - मांगले व्हाया देववाडी, काखे
जत - वज्रवाड
पलूस - तासगाव व्हाया बांबवडे
चौकट
एसटीचा खर्च वाढला
रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे एसटीच्या मेंटेनन्स खर्चात दुप्पट वाढ झाली आहे. एसटीचे कमान पाटे तुटणे, टायर पंक्चर, खराब होण्यामुळे खर्च वाढला होता. एसटीच्या मेंटेनन्सवर दहा ते पंधरा लाखांचा जादा खर्च होत असल्यामुळे खड्डे असलेल्या मार्गावर एसटीची सेवा बंद केली आहे, असे एसटीच्या प्रशासनाकडून सांगण्यात आले.
कोट
एसटी जात असलेल्या जिल्ह्यातील नऊ मार्गांवर सध्या खड्डे जास्त आहेत. यामुळे एसटीच्या मेंटेनन्सचा खर्चही वाढला असल्यामुळे तेथील प्रवासी वाहतूक बंद करत आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांना दिले आहे.
-अरुण वाघाटे, विभाग नियंत्रक, एसटी महामंडळ, सांगली विभाग.
चौकट
आगार आणि सुरू असलेल्या बसेस
आगार बसेस
सांगली १०७
मिरज १०४
इस्लामपूर ८०
तासगाव ७३
विटा ६२
जत ७६
आटपाडी ५५
क.महांकाळ ५८
शिराळा ५३
पलूस ४१
एकूण ७०९