प्रवासी घटल्याने एसटी फेऱ्या निम्म्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:48 AM2021-03-04T04:48:00+5:302021-03-04T04:48:00+5:30
गेल्या काही दिवसात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने गेल्या आठवड्यापासून कर्नाटकात प्रवेशासाठी कोरोना निगेटिव्ह तपासणी अहवालाची सक्ती करण्यात आली ...
गेल्या काही दिवसात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने गेल्या आठवड्यापासून कर्नाटकात प्रवेशासाठी कोरोना निगेटिव्ह तपासणी अहवालाची सक्ती करण्यात आली आहे. कागवाड सीमेवर महाराष्ट्रातून येणाऱ्या खासगी वाहनचालकांना रोखण्यात येत आहे. मात्र महाराष्ट्रातून एसटी बसेसमधून येणाऱ्या प्रवाशांना प्रवेश मिळत आहे. मात्र महाराष्ट्रातील प्रवाशांवर निर्बंध घातल्यानंतर कर्नाटकातून येणाऱ्या बसेसचीही संख्या कमी झाली आहे. प्रवासी नसल्याने मिरजेत येणाऱ्या कर्नाटक बसेसची संख्या घटली आहे. मिरज आगाराच्या दररोज जमखंडीला जाणाऱ्या केवळ चारच फेऱ्या आहेत. मिरजेशिवाय जिल्ह्यातील इतर आगाराच्या बसेसच्याही कर्नाटकात मोजक्याच फेऱ्या सुरू आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांचा प्रतिसाद अतिशय कमी असल्याचे मिरज आगार व्यवस्थापक आप्पासाहेब खांडेकर यांनी सांगितले. कर्नाटक प्रशासनाने कागवाड नाक्याजवळ तपासणी सुरू केली आहे. महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या प्रवाशांकडे कोरोना तपासणीचा दाखला नसल्यास खासगी वाहने कर्नाटक सीमेवर रोखण्यात येत असल्याने अनेक खासगी वाहने नरवाडमार्गे कच्च्या रस्त्याने कर्नाटकात जात आहेत. मात्र म्हैसाळ सीमेवर कर्नाटकातून येणाऱ्यांवर महाराष्ट्र सरकारचे कसलेच बंधन नाही. कर्नाटक एसटी फेऱ्या कमी झाल्याने मिरज बसस्थानकात गर्दी कमी असल्याचे चित्र आहे. प्रवासी संख्या घटल्याने दोन्ही राज्यातील एसटीचा महसूल घटला आहे.