रेल्वे बंदमुळे मिरजेतून कोल्हापूरला एसटीची सेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:28 AM2021-07-30T04:28:43+5:302021-07-30T04:28:43+5:30
मिरज : कोल्हापूर जिल्ह्यात पंचगंगा नदीच्या महापुराने मिरज-कोल्हापूर रेल्वेमार्गाखालील भराव वाहून गेला आहे. यामुळे मिरज-कोल्हापूर रेल्वे वाहतूक ...
मिरज : कोल्हापूर जिल्ह्यात पंचगंगा नदीच्या महापुराने मिरज-कोल्हापूर रेल्वेमार्गाखालील भराव वाहून गेला आहे. यामुळे मिरज-कोल्हापूर रेल्वे वाहतूक बंद आहे. यामुळे मिरज स्थानकातून एसटीद्वारे कोल्हापूरला प्रवासी वाहतूक करण्यात येत आहे.
मिरज-कोल्हापूरदरम्यान पंचगंगा नदीला आलेल्या पुरामुळे रुकडी ते गांधीनगरदरम्यान रेल्वेमार्गाचे मोठे नुकसान झाल्याने कोल्हापूरला जाणाऱ्या रेल्वे बंद आहेत. हरिप्रिया, महाराष्ट्र, नागपूर, चन्नम्मा, अजमेर, जोधपूर, हुबळी, दादर, पाँडिचेरी या एक्स्प्रेसने मिरजेत येणाऱ्या प्रवाशांसाठी मिरज स्थानकापासून दिवसांतून तीन वेळा कोल्हापूरला एसटी सोडण्यात येत आहे.
गेल्या आठवड्यात पुरामुळे मिरजेत अडकलेल्या कोल्हापूरच्या प्रवाशांच्या भोजनाचीही व्यवस्था मध्य रेल्वेकडून मिरज स्थानकात करण्यात आली होती. रेल्वेमार्गाच्या दुरुस्तीसाठी १ ऑगस्टपर्यंत गोंदिया-कोल्हापूर, कोल्हापूर-मुंबई, तिरुपती-कोल्हापूर एक्स्प्रेस मिरज स्थानकातून सोडण्यात येणार आहेत. याशिवाय मिरज स्थानकातूनच धनबाद, अहमदाबाद, नागपूर विशेष एक्स्प्रेस सुरू होणार आहेत. महापुरामुळे मध्य रेल्वेने कोयना व महालक्ष्मी एक्स्प्रेससह कोल्हापूरकडे जाणाऱ्या सर्व रेल्वेगाड्या रद्द केल्या आहेत.