एसटीची चाके थांबली; प्रवाशांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 11:50 PM2017-10-17T23:50:07+5:302017-10-17T23:50:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : एसटी कर्मचाºयांनी पुकारलेल्या बेमुदत संपामुळे मंगळवारी जिल्ह्यातील दहा आगारांमधील १७७६ बसेसपैकी केवळ १२ बसेसच्याच फेºया झाल्या. सकाळी नऊनंतर शंभर टक्के बसेस बंद होत्या. त्यामुळे ऐन दिवाळीत प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. या आंदोलनामुळे दिवसभराचे सुमारे ७० लाखांचे उत्पन्न बुडाले.
सांगलीत संप मोडीत काढण्याचा महाराष्ट्र एसटी कामगार सेनेकडून प्रयत्न झाला; पण तो सर्वच कामगार संघटनांनी हाणून पाडला. बस स्थानकावरच लागलेली खासगी प्रवासी वाहनेही कर्मचाºयांनी बस स्थानकातून बाहेर काढली.
दिवाळीमध्ये एसटी बसेसना प्रचंड गर्दी असते. या कालावधित एसटीकडून हंगामी भाडेवाढही केली जाते. त्यामुळे तुलनेने दिवाळीतील कमाई जास्त असते. पण विविध मागण्यांसाठी मंगळवारी मध्यरात्रीपासून कर्मचाºयांनी पुकारलेल्या संपामुळे सांगली जिल्ह्यातील सर्व आगारांचे मिळून दिवसाला ७० लाखांपेक्षा अधिक उत्पन्न बुडणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
सांगलीच्या मुख्य बस स्थानकात प्रवाशांची सकाळी गर्दी झाली होती. मात्र एसटी कर्मचाºयांचा संप असल्याचे लक्षात येताच प्रवासी खासगी वाहतुकीकडे वळले. राज्य शासनाच्या आदेशानुसार उपप्रादेशिक परिवहन अधिकाºयांनी खासगी प्रवासी वाहने थेट बस स्थानकातच आणली. याची माहिती एसटी कामगारांना मिळताच त्यांनी आंदोलनस्थळावरून बस स्थानकाकडे मोर्चा वळविला. खासगी प्रवासी वाहतुकीचा धिक्कार असो, अशा घोषणा देत ही वाहतूक रोखली. यामुळे काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी मध्यस्थी करून वादावर पडदा टाकला. खासगी प्रवासी वाहतूक करणाºयांनी गाड्या बाहेर काढल्या.
दुपारी दोनपर्यंत आंदोलन शांततेत सुरू होते. दुपारी दोन वाजता महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे कार्यकर्ते चालक व वाहकाला विनवणी करून एक बस सांगली स्थानकावर घेऊन आले. प्रवासी नसल्यामुळे ही बस थांबूनच होती. तेवढ्यात अन्य सर्व कामगार संघटनांचे कर्मचारी बसजवळ आले व त्यांनी चालकाच्या हातात बांगड्या दिल्या. यावरू वादावादी झाली. ‘तुमच्याकडे पैसे नसतील, तर आम्ही भीक मागून देतो’, असे म्हणून कर्मचाºयांनी पैसे गोळा केले. परंतु, वाहक पैसे न घेता निघून गेला. वाद वाढू नये म्हणून चालक व वाहकाने बस पुन्हा आगारात लावली. त्यानंतर दिवसभर बसेसची जिल्ह्यातील सर्व वाहतूक बंद होती. जिल्ह्यातील एकूण १७७६ बसेसपैकी सकाळी केवळ तासगाव, आटपाडी, कोल्हापूर मार्गावर १२ बसेस धावल्या. त्यानंतर दिवसभर वाहतूक ठप्प होती.
संप मोडीत काढण्याचा प्रयत्न नको : बिराज साळुंखे
राज्य सरकार, प्रशासन आणि महाराष्ट्र एसटी कामगार सेनेकडून कर्मचाºयांच्या न्याय्य हक्कांसाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन चालू आहे. तरीही काही मंडळींनी मंगळवारी संप मोडण्याचा प्रयत्न केला. त्यांना कर्मचाºयांनी चोख उत्तर दिले आहे. याचा विचार करून शासनाने कामगारांच्या मागण्या त्वरित मान्य कराव्यात, अन्यथा आंदोलनाची तीव्रता आणखी वाढविण्यात येईल, असा इशारा संघटनेचे विभागीय अध्यक्ष बिराज साळुंखे यांनी दिला.