एस.टी. कामगारांचे नेते साथी बिराज साळुंखे यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2018 09:25 AM2018-07-05T09:25:57+5:302018-07-05T09:26:35+5:30
एस.टी.कामगार संघटनेचे विभागीय अध्यक्ष आणि राज्यातील असंघटीत कामगारांचे नेते साथी बिराज साळुंखे (वर्ष 80 वय) यांचे बुधवारी मध्यरात्री येथे निधन झाले.
सांगली : एस.टी.कामगार संघटनेचे विभागीय अध्यक्ष आणि राज्यातील असंघटीत कामगारांचे नेते साथी बिराज साळुंखे (वर्ष 80 वय) यांचे बुधवारी मध्यरात्री येथे निधन झाले. गेले काही दिवस ते मेंदू रोगावरील उपचारासाठी दवाखान्यात दाखल होते.
मुंबईत विद्यार्थी दशेत असताना कॉ. एस ए डांगे, एस एम जोशी यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी गिरणी कामगार संघटनेत कार्य केले होते. पुढे ते सांगलीला परतले आणि इथले हमाल व इतर असंघटीत कामगारांसाठी झटू लागले. मोलकरणी, काच पत्रा गोळा करणारे, अंगणवाडी सेवक अशा सामान्य असंघटीत वर्गासाठी ते आयुष्यभर झटले. एस. टी. कामगार संघटनेच्या कार्यासाठी ते या वयातही गेल्या महिन्यापर्यंत राज्यभर प्रवास करीत होते. सीमाप्रश्नाच्या मुद्यावर काँग्रेस पक्षाच्या सचिव पदाचा त्याग करुन ते सीमा आंदोलनात अग्रभागी राहिले. सांगली जिल्ह्यात हा प्रश्न जागृत ठेवण्यात तसेच बेळगाव जिल्ह्यात अनेक आंदोलनात त्यांनी कारावासही सोसला होता. दरम्यान त्यांच्या निधनाचे वृत्त पसरताच मध्यरात्री कामगारांनी दवाखान्याबाहेर गर्दी केली होती.