एसटी कर्मचारी संपावर ठाम; निम्या कर्मचाऱ्यांचा पगारवाढ स्वीकारण्यास नकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2021 11:53 AM2021-12-04T11:53:44+5:302021-12-04T11:54:11+5:30
शासनाने वेतनवाढ घोषित केली, तरी कर्मचारी मात्र संपावर कायम आहेत.
सांगली : राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या संपाचा तिढा सुटायचे नाव घेत नाही. शहरी आणि ग्रामीण प्रवासी यामुळे त्रस्त झाले आहेत. अशातच शासनाने वेतनवाढ घोषित केली, तरी कर्मचारी मात्र संपावर कायम आहेत. सांगली विभागातील २०३५ जणांनी पगारवाढ स्वीकारली असून ते कामावर हजर आहेत. तर २०२० कर्मचारी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. त्यांचे आंदोलन आजही संपावरच आहेत.
सांगली विभागात सांगली, मिरज, कवठेमहांकाळ, जत, आटपाडी, तासगाव, विटा, पलूस, इस्लामपूर, शिराळा या दहा आगारांचा समावेश आहे. आगारस्तरावर चालक, वाहक, तांत्रिक आणि प्रशासकीय असे ४०५५ कर्मचारी कार्यरत आहेत. महिनाभरापासून कर्मचारी संपावर कायम आहेत. त्यापैकी २०३५ कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग नोंदविला नाही. परंतु, या तुटपुंज्या कर्मचाऱ्यांवर बससेवा सुरू करणे अडचणीचे जात आहे. गत तीन दिवसांपासून दहा आगारातील २८६ बसेस धावत आहेत. इतर आगाराच्या बसेस ठप्प आहेत. शहरी आणि ग्रामीण भागातील प्रवाशांना बाहेरगावी जाताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
आगारनिहाय आकडेवारी
आगार एकूण कर्मचारी बसेस आगाराबाहेर
सांगली ५७० ५३
मिरज ४५९ ४७
इस्लामपूर ४२३ ४५
तासगाव ३७३ १८
विटा ३५९ ३०
जत ३७२ १६
आटपाडी २७४ १३
क.महांकाळ ३०३ २२
शिराळा ३०३ १६
पलूस २१६ २६
एकूण एसटी कर्मचारी : ४०५५
कामावर हजर : २०३५
संपात सहभागी : २०२०
एकूण बसेसची संख्या : ७००
आगाराबाहेर : २८६
खासगी गाड्यांची सवय झाली
गेल्या दोन वर्षांत एसटीची सेवा कोलमडलीच आहे. कोरोना संकटातून बाहेर आल्यानंतर एसटीची वाहतूक सुरू झाली, तोपर्यंत गेल्या महिन्याभरापासून बंद आहे. यामुळे खासगी गाड्यांनी प्रवास करण्याची सवय झाली आहे. एसटी बंद असल्याचा फारसा फरक पडत नाही. -एकनाथ सूर्यवंशी, प्रवासी.
ग्रामीण भागातील प्रवासाठी खात्रीशीर वाहन, अशी एसटीची ओळख होती. पण गेल्या दीड वर्षात एसटी महामंडळाच्या प्रशासनाने ही ओळख संपविली आहे. यामुळे ग्रामीण जनतेनही खासगी प्रवासी वाहतुकीशी जुळवून घेतले आहे. एसटी बंद असल्याची उणीव जाणवत नाही. -शिवाजी साळुंखे, प्रवासी