सांगली जिल्ह्यात योग चळवळीच्या रुंदावल्या कक्षा...अनेक संस्थांचा पुढाकार :आशादायी चित्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 12:18 AM2018-06-21T00:18:42+5:302018-06-21T00:18:42+5:30
शरीराला आरोग्याचा मंत्र देत सांगली जिल्ह्यात पेटविलेली योगाची मशाल प्रज्वलित होऊन तिच्या प्रकाशात आता चळवळीचे रुजलेले बीज अंकुरताना दिसत आहे
शरद जाधव ।
सांगली : शरीराला आरोग्याचा मंत्र देत सांगली जिल्ह्यात पेटविलेली योगाची मशाल प्रज्वलित होऊन तिच्या प्रकाशात आता चळवळीचे रुजलेले बीज अंकुरताना दिसत आहे. ४५ वर्षांपासूनच्या जनजागृतीच्या आसनांनी आता चळवळ जिल्ह्यात सर्वदूर रुजत असल्याचे आशादायी चित्र आहे.
जिल्ह्यात सांगली जिल्हा योग परिषद, विश्वयोग दर्शन केंद्र, पतंजलि योग समिती, आर्ट आॅफ लिव्हिंगसह अनेक स्वयंसेवी संस्थांनीही योग प्रसारात आघाडी घेतली असून, लहान मुलांपासून वृध्दांपर्यंत सर्वांसाठी योग शिबिरांचे आयोजन होत आहे. चुकीच्या सवयी, जंकफूडचा वाढता वापर, विविध क्षेत्रातील वाढती स्पर्धा यांसह अनेक कारणांनी सध्या तणावात वाढ होत आहे. यावर वैद्यक शास्त्रांनी विविध संशोधने केली असली तरी, प्रभावी उपाय म्हणून योगाचा प्रचार वाढत आहे. जागतिक योग दिनाच्या निमित्ताने जिल्ह्यातील योग चळवळीचा आढावा घेतल्यानंतर आशादायी चित्र दिसून आले.
वर्षभर सुरू असतात उपक्रम
पतंजलि योग समितीच्यावतीने शहरातील विविध उपनगरात नियमितपणे योग शिबिरे घेण्यात येतात. सांगली शहरात आमराई, त्रिकोणी बाग, महावीर उद्यान, बालाजीनगर, गावभाग, तरूण भारत क्रीडांगण, छत्रपती शिवाजी क्रीडांगण याठिकाणी योग शिबिरे होतात. चंद्रकांत सबनीस त्रिकोणी बाग परिसरात योग प्रशिक्षण देतात. ‘पतंजलि’च्यावतीने जिल्हाभरही तालुक्याच्या ठिकाणी व गावांमध्ये योग शिबिरे होत आहेत. हरिद्वार येथे प्रशिक्षण घेऊन आलेले योग शिक्षक शिबिरार्थींना प्रशिक्षण देतात. ही शिबिरे पूर्णपणे नि:शुल्क असतात. जिल्हा प्रभारी श्याम वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली वर्षभर हे उपक्रम सुरू असतात.
शिबिरांना मिळतोय प्रतिसाद
पतंजलि योग समिती, मिरजेचे विश्वदर्शन योग केंद्र, आर्ट आॅफ लिव्हिंग या संस्थांबरोबरच सांगली शहरात अनेकजण स्वतंत्रपणेही योग शिबिरे आयोजित करत आहेत. त्यास नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सांगलीत नीलम गाजी घेत असलेल्या ‘फिटनेस डेफिनेशन’मध्ये योगाला विशेष महत्त्व आहे. दरवर्षी योग दिनाला शहरात विविध ठिकाणी शिबिरे घेतली जातात. आज योग दिनानिमित्त १०८ सूर्यनमस्काराचा उपक्रम गाजी यांच्यातर्फे राबविण्यात येणार आहे.
४५ वर्षांपासूनची परंपरा...
सांगलीतील योगाची चळवळ खूप जुनी आहे. जवळपास ४५ वर्षांपासून सांगलीत याविषयी जागृती व प्रसाराचे काम सुरू झाले आहे. सांगलीतील टिळक स्मारक, सावरकर प्रतिष्ठान, मिरजेतील अंबाबाई तालीम, भानू तालीम संस्थेत योगासनांचे प्रशिक्षण दिले जात होते. १९८१ मध्ये अॅड. वसंतराव पाटील यांच्या पुढाकाराने योग संमेलन सांगलीत भरविले होते. दिवंगत माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील त्या संमेलनाचे अध्यक्ष होते.