चरणमध्ये जिल्हा बॅँकेत चोरीचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2016 11:24 PM2016-04-03T23:24:29+5:302016-04-03T23:52:31+5:30
घटनेबाबत गोपनीयता : कुलूप न तुटल्याने प्रयत्न फसला
चरण : चरण (ता. शिराळा) येथे जिल्हा मध्यवर्ती बॅँकेच्या शाखेत खिडकीचे गज कापून चोरट्यांनी लॉकर तोडण्याचा प्रयत्न केला. कुलूप न तुटल्याने मोठी रक्कम बचावली. ही घटना ३० मार्च रोजी मध्यरात्री घडली असून, याबाबत बँक प्रशासन व पोलिसांनी कमालीची गोपनीयता पाळली आहे.
चरण येथे बसस्थानक चौकात जिल्हा बँकेची शाखा आहे. दररोज लाखो रुपयांची उलाढाल येथे होते. सोने तारण, ठेवी, कारखानदारांची बिले या माध्यमातून मोठे व्यवहार होत असतात. मार्चअखेरमुळे बँकेत मोठी आर्थिक उलाढाल सुरू होती. यादरम्यान बुधवार, दि. ३० रोजी मध्यरात्री चोरट्यांनी बँकेच्या इमारतीच्या दक्षिण बाजूला असलेल्या लहान खिडकीचा गज तोडून आत प्रवेश केला. सुमारे दोन टन वजनाचे पोलादी लॉकर तोडण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आले नाही. चोरीची एकंदरीत पध्दत पाहता चोरटे एकाहून अधिक असावेत, अशी शक्यता आहे.
याबाबत बॅँक प्रशासनाने पोलिसात तक्रार दिली असून, पोलिसांनी पंचनामा करून तपास सुरू केला आहे. चोरट्यांनी तोडलेल्या खिडकीची बॅँक प्रशासनाने तातडीने डागडुजी करून घेतली असून, या प्रकाराबाबत बॅँक प्रशासन व पोलिसांनी कमालीची गोपनीयता बाळगली आहे. (वार्ताहर)