स्थायी समिती सदस्य निवडीचा खेळ रंगणार
By Admin | Published: July 25, 2016 12:44 AM2016-07-25T00:44:49+5:302016-07-25T00:44:49+5:30
महापालिकेतील काँग्रेसमध्ये गृहकलह : स्वाभिमानी विकास आघाडीचे नोंदणी रद्दमुळे त्रांगडे
सांगली : महापालिकेच्या स्थायी समितीतील आठ सदस्य पुढील महिन्यात निवृत्त होत आहेत. नव्या सदस्य निवडीची प्रक्रिया आॅगस्ट महिन्यातील महासभेत होणार आहे. सत्ताधारी काँग्रेसमधील गृहकलह, निवडणूक आयोगाकडून स्वाभिमानी आघाडीची मान्यता रद्द या पार्श्वभूमीवर निवडीचा खेळ चांगलाच रंगणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मात्र आमदार जयंत पाटील यांचे एकमुखी नेतृत्व असल्याने त्यांचाच निर्णय अंतिम राहील.
स्थायी समितीत काँग्रेसचे ९, राष्ट्रवादीचे ५, तर स्वाभिमानी आघाडीचे दोन असे सोळा सदस्य आहेत. त्यापैकी आठ सदस्य आॅगस्ट महिन्यात निवृत्त होत आहेत. त्यात काँग्रेसचे महापौर हारूण शिकलगार, दिलीप पाटील, शिवाजी दुर्वे, राष्ट्रवादीचे शेडजी मोहिते, आशा शिंदे, जमिला बागवान, स्वाभिमानीचे शांता जाधव, अश्विनी खंडागळे यांचा समावेश आहे. सभापती संतोष पाटील यांचीही मुदत आॅगस्टमध्ये संपत आहे. नव्या सदस्यांच्या निवडी आॅगस्टमधील महासभेत होणार आहेत. त्यानंतर सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सभापती निवड होईल.
सध्या सत्ताधारी कॉँग्रेसमध्ये गृहकलह उफाळून आला आहे. मदन पाटील यांच्या निधनानंतर काँग्रेसमध्ये विशाल पाटील यांनी स्वतंत्र गट तयार केला आहे. त्याला स्वाभिमानी आघाडीच्या सदस्यांची साथसंगत मिळत आहे. मदन पाटील गट विरुद्ध विशाल पाटील गट असा सामना पालिकेच्या राजकारणात सुरू आहे. गत महापौर, उपमहापौर निवडीवेळी या गटाने उघडरित्या बंडाचा झेंडा हाती घेतला होता. अखेर उपमहापौर पदावर तडजोड झाल्याने विशाल पाटील गटाचे बंड शमले होते. त्यानंतर मागासवर्गीय समिती सभापती निवडीवेळीही या गटाने डोके वर काढले होते, पण मदनभाऊ गटाने राष्ट्रवादीशी हातमिळवणी करीत विशाल पाटील गटाला शह दिला होता. त्यामुळे स्थायी सदस्य निवडीवेळीही हा संघर्ष उफाळून येण्याची चिन्हे आहेत.
विशाल पाटील गटाकडून स्थायी समितीतील प्रतिनिधित्वासाठी आग्रही भूमिका घेतली जाईल. त्यात सदस्य निवडीचे अधिकार जयश्रीताई पाटील व आमदार पतंगराव कदम यांच्याकडे असतील. त्यांच्या आदेशानेच सदस्य निवडी होणार असल्याने या गटाला प्रतिनिधित्व मिळणार का? हा खरा प्रश्न आहे. त्यात गटनेते किशोर जामदार यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. त्यांच्या पत्रावर निवडी होत असल्याने ते कोणाची नावे देतात, यावर बरीच गणित अवलंबून आहेत.
दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सारेच काही आलबेल आहे असे नाही. राष्ट्रवादीच्या काही सदस्यांनी विशाल पाटील गटाशी संधान साधले आहे. पण राष्ट्रवादीचे निर्णय घेण्याचे सर्वाधिकार आमदार जयंत पाटील यांच्याकडे आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या तीन सदस्यांचा निर्णय जयंतरावच घेतील, असे दिसते. (प्रतिनिधी)
मदनभाऊ गटाच्या हाती नाड्या
स्वाभिमानी आघाडीची मान्यता निवडणूक आयोगाने रद्द केली आहे. त्यामुळे महापालिकेत ही आघाडी अस्तित्वशून्य झाली आहे. या आघाडीचे दोन सदस्य स्थायी समितीत आहेत. अजून तरी स्वाभिमानीच्या मान्यतेबाबत कोणताही आदेश महापौर अथवा आयुक्तांनी काढलेला नाही. स्थायी समिती निवडीवेळी मात्र हा मुद्दा कळीचा ठरणार आहे. स्थायी समितीत आघाडीला स्थान न देण्याची खेळी सत्ताधारी काँग्रेसने खेळल्यास स्वाभिमानीची मोठी कोंडी होणार आहे. स्वाभिमानी आघाडीच्या नाड्या आता मदनभाऊ पाटील गटाच्या हातात आहेत. सत्ताधाऱ्यांनी मनात आणले तर स्वाभिमानीच्या दोन जागा काढून घेऊन काँग्रेस व राष्ट्रवादीला प्रत्येकी एक जागा मिळू शकते. तशा हालचालीही सुरू आहेत.