साडेतीन महिन्यानंतर आज स्थायीची सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:42 AM2020-12-15T04:42:19+5:302020-12-15T04:42:19+5:30
सांगली : सप्टेंबरनंतर कोरोनाचा संसर्ग वाढल्याने आणि नवीन सभापती निवड लांबणीवर गेल्याने स्थायी समितीची सभा होऊ शकली नव्हती. आता ...
सांगली : सप्टेंबरनंतर कोरोनाचा संसर्ग वाढल्याने आणि नवीन सभापती निवड लांबणीवर गेल्याने स्थायी समितीची सभा होऊ शकली नव्हती. आता साडेतीन महिन्यानंतर मंगळवारी ही सभा होत आहे. नूतन सभापती पांडुरंग कोरे यांच्या अध्यक्षतेखाली होणारी ही पहिलीच सभा वादग्रस्त विषयामुळे चर्चेत आहे.
स्थायी समितीची मुदत ३१ ऑगस्ट रोजी संपली. त्याच काळात महापालिका क्षेत्रासह जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढला होता. दररोज दोनशे ते तीनशे रुग्ण सापडत होते. त्यामुळे सभापती निवड लांबणीवर गेली होती. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात सभापती निवडी पार पडल्या. त्यानंतरही दोन महिने स्थायीची सभा झाली नाही. आता मंगळवारी ही सभा होत आहे.
या सभेत महापुराच्या काळात म्हणजे दीड वर्षापूर्वी केलेल्या कामांची बिले मंजुरीसाठी आली आहेत. एकाच ठेकेदाराची ही बिले असून, त्याचे तुकडे करण्यात आल्याचे दिसून येते. या बिलाच्या मान्यतेवरून सभेत चर्चा होणार आहे. याशिवाय डांबरी पॅचवर्कच्या कामासाठी वाहनचालक, सुपरवायझर, मजूर, साहित्य खरेदीपोटी ७८ लाख रुपयांच्या खर्चाला मान्यता देण्याचा विषय अजेंड्यावर आहे. मिरज शहरातील ड्रेनेज दुरुस्तीसाठी वार्षिक दरकरार, मिरज रोड बुस्टर पंप ते विश्रामबाग जयहिंद काॅलनीपर्यंत रायझिंग मेन बदलणे, काळी खण टाकीपासून बापट मळ्यापर्यंत नवीन वाहिनी टाकण्याचे विषय घेण्यात आले आहेत.
चौकट
ब्लिचिंग पावडरसाठी २६ टक्के जादा दराची निविदा
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून ३१ टन ब्लिचिंग पावडर खरेदी केली जाणार असून, त्यासाठी २६.३१ टक्के जादा दराची निविदा आली आहे. यापोटी २८ लाख १७ हजार रुपये इतका खर्च होणार आहे.