उपनगरांत साचलेले पाणी ठरतेय धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:17 AM2021-07-12T04:17:40+5:302021-07-12T04:17:40+5:30
सांगली : पंधरवड्याच्या प्रतीक्षेनंतर शहरात पुन्हा एकदा पावसाचे आगमन झाले आहे. यामुळे उपनगरातील मोकळ्या प्लॉटवर पाणी साचून राहत असून, ...
सांगली : पंधरवड्याच्या प्रतीक्षेनंतर शहरात पुन्हा एकदा पावसाचे आगमन झाले आहे. यामुळे उपनगरातील मोकळ्या प्लॉटवर पाणी साचून राहत असून, यामुळे डासांचे प्रमाण वाढत आहे. शिवाय या पाण्याचा वेळेत निचरा न झाल्यास डेंग्यूची शक्यता नाकारता येत नसल्याने प्रशासनाने मोकळ्या प्लॉटवरील पाण्याचा निचरा करण्याची मागणी होत आहे.
--------
रिक्त पदांमुळे अडचण
सांगली : कोरोनामुळे प्रशासनावरील वाढलेला ताण, कामकाजात आलेले निर्बंध आणि त्यात अनेक पदे रिक्त असल्याने कामात अडचणी येत आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी, तहसीलदार पदावरील अधिकारी नसल्याने कामात अडचणी येत असून, शासनाने ही पदे तातडीने भरण्याची मागणी होत आहे.
---------
बंदीतही वाळू उपसा सुरूच
सांगली : जिल्ह्यातील येरळा, अग्रणीसह इतर नद्यांतील वाळू उपसा अद्यापही सुरूच आहे. वाळू उपशाला बंदी असतानाही त्यास न जुमानता वाळूची अवैध वाहतूकही सुरू असून, महसूल विभागाकडून यावर कारवाई होत असली तरी पुन्हा लगेचच वाळू उपसा सुरू करण्यात येत आहे. शासनाचा महसूूल बुडवून होणारी ही वाहतूक थांबविण्याची मागणी होत आहे.
-----
तरुणांना शासन भरतीची प्रतीक्षा
सांगली : राज्य शासनाने येत्या काही महिन्यांत १५ हजारांहून अधिक रिक्त पदे भरण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून अभ्यास करीत असलेल्या व नोकरीसाठी प्रयत्नशील तरुणांत समाधानाचे वातावरण आहे. शासनाने आता विलंब न करता तातडीने भरती प्रक्रिया राबविण्याची गरज असून, त्यामुळे प्रशासनावरील ताणही कमी होण्यास मदत होणार आहे.
---------
जांभळांची आवक सुरूच
सांगली : उन्हाळा संपता-संपता बाजारात दाखल होणाऱ्या जांभळांची आता पावसाळ्यातही आवक सुरूच आहे. यंदा जांभळाच्या उत्पादनावर चांगलाच परिणाम झाला होता. त्यामुळे पहिल्या काही दिवसांत जांभळाची आवक घटली होती. आता स्थानिकसह बाहेरच्या जिल्ह्यांतूनही जांभळाची आवक सुरू असून, किमान १५ दिवस आवक सुरू राहील, असा अंदाज विक्रेत्यांनी व्यक्त केला.