अंबाबाई संगीत महोत्सवास प्रारंभ
By admin | Published: October 13, 2015 10:12 PM2015-10-13T22:12:03+5:302015-10-13T23:53:22+5:30
संगीत महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी संगीत सभेच्या ६१ वर्षांच्या परंपरेचे कौतुक केले. महोत्सवात पंडित आनंद भाटे यांनी राग दुर्गा आळविला.
मिरज : मिरजेत अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्याहस्ते मंगळवारी झाले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित आनंद भाटे होते. पंडित आनंद भाटे यांच्या शास्त्रीय गायनाला श्रोत्यांची दाद मिळाली.
नऊ दिवस चालणाऱ्या अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी संगीत सभेच्या ६१ वर्षांच्या परंपरेचे कौतुक केले. महोत्सवात पंडित आनंद भाटे यांनी राग दुर्गा आळविला. विलंबित एकतालात ‘तू रस ता न रे’ द्रुत त्रितालात चतर सुगर या चीजा, ‘वद जाऊ कुणाला शरण’ हे नाट्यपद, ‘इंद्रायणीकाठी’, ‘सौभाग्य द लक्ष्मी बारव्वा’ ही भक्तिगीते, बालगंधर्व चित्रपटातील चिन्मया सकल ऱ्हदया ही भैरवी त्यांनी गायिली. शास्त्रीय गायनातील त्यांच्या विविध स्वरछटांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. पंडित भाटे यांना भरत कामत यांनी समर्पक तबलासाथ केली. सुयोग कुंडलकर यांनी हार्मोनियमसाथ, तर माऊली टाकळकर यांनी तालवाद्याची साथ केली.
महोत्सवाच्या उद्घाटन सभेस मोठ्या सख्येने संगीतरसिक उपस्थित होते. संगीत महोत्सवात बुधवारी मराठी गायक मंगेश बोरगावकर (लातूर) यांना ‘संगीतकार राम कदम’ पुरस्कार सांगली अर्बन बँकेचे अध्यक्ष गणेश गाडगीळ यांच्याहस्ते देण्यात येणार आहे.
मधू पाटील, विनायक गुरव, बाळासाहेब मिरजकर, मजीद सतारमेकर, संभाजी भोसले, डॉ. शेखर करमरकर यांनी संगीत सभेचे संयोजन केले. (वार्ताहर)