तासगावला कोविड केअर सेंटर सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:29 AM2021-04-20T04:29:00+5:302021-04-20T04:29:00+5:30
सोमवारी रोहित पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रवींद्र पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन मागणीचे निवेदन दिले. यानंतर ...
सोमवारी रोहित पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रवींद्र पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन मागणीचे निवेदन दिले. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने मागणीची दखल घेत तासगाव येथील कोविड केअर सेंटर सुरू करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.
निवेदनात म्हटले आहे की, तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. साथीचे नियंत्रण करण्यासाठी तासगाव ग्रामीण रुग्णालयाच्या कोविड सेंटरमध्ये रूपांतर करण्यात आले आहे. शेजारी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीमध्ये २० खाटांचे रुग्णालय सुरू करण्यासाठी आवश्यक अशी सामग्री तयार ठेवण्यात आली आहे.
या ठिकाणी आवश्यक असा वैद्यकीय कर्मचारी वर्ग उपलब्ध नसल्याने रुग्णांना उपचारासाठी खासगी कोविड सेंटरमध्ये जावे लागते. बिकट परिस्थितीत रुग्णांना खासगी कोविड सेंटरमधील महागडे उपचार परवडणारे नसल्याने गेल्यावर्षी नेमणूक केल्याप्रमाणे कर्मचाऱ्यांची परत एकदा तातडीने नेमणूक करण्यात यावी. हे कोविड केअर सेंटर त्वरित सुरू करण्यात यावे.
तत्पूर्वी रोहित पाटील यांनी तासगाव कोविड रुग्णालय आणि कोविड केअर सेंटरला भेट दिली. तेथील डाॅक्टरांशी चर्चा केली. कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला होता. रुग्णांना आणखी चांगल्या दर्जाचे उपचार देण्यासाठी आणखी काही मदत करता येईल का, याची माहिती घेतली. यानंतर त्यांनी सांगलीत जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली.