चारा छावण्या तात्काळ सुरू करा
By admin | Published: April 29, 2016 11:07 PM2016-04-29T23:07:44+5:302016-04-30T00:49:47+5:30
जि. प. जलव्यवस्थापन समिती बैठक : दुष्काळावर गंभीर चर्चा
सांगली : जिल्ह्यातील जतबरोबरच आटपाडी, खानापूर, तासगाव, कवठेमहांकाळ, मिरजपूर्व भागामध्ये चाऱ्याचा प्रश्न गंभीर निर्माण झाला आहे. तेथे शासनाने तातडीने चारा छावण्या सुरु कराव्यात, अशा मागणीचा ठराव जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समितीत शुक्रवारी करण्यात आला.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रेश्माक्का होर्तीकर यांच्या अध्यक्षतेखाली जलव्यवस्थापन समिती बैठक झाली. जिल्ह्यात दुष्काळाची भीषण परिस्थिती असून आटपाडी, तासगाव, खानापूर, कवठेमहांकाळ, मिरज पूर्व तालुक्यात पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर आहे. या ठिकाणी राज्य शासनाने तातडीने चारा छावण्या सुरु कराव्यात, अशा मागणीचा ठराव अॅड्. बाबासाहेब मुळीक यांनी मांडला. यावर होर्तीकर यांनी, शासनाकडे तसा ठराव पाठविण्यात येईल, असे आश्वासन दिले.
टेंभू योजनेचे पाणी आटपाडी तालुक्यातील अर्जुनवाडी, बनपुरी आणि खानापूर तालुक्यातील भाग्यनगर तलावात त्वरित सोडण्याची मागणी केली. त्यानुसार टेंभू योजनेच्या अधिकाऱ्यांनी पाणी सोडण्याचे आश्वासन दिले. दोन कोटींच्या निधीतून कोल्हापूर पध्दतीचे बंधारे बांधण्याचा निर्णय झाला. यामध्ये बहुतांशी बंधारे जत तालुक्यातीलच आहेत. यावेळी उपाध्यक्ष रणजित पाटील, सभापती संजीवकुमार सावंत, सुनंदा पाटील, सुवर्णा नांगरे, सूर्यकांत मुटेकर, सुवर्णा पिंगळे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
रोजगार हमीच्या कामाची चौकशी होणार
खानापूर तालुक्यातील रोजगार हमीच्या कामामध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप खुद्द कंत्राटी तांत्रिक अधिकारी सूर्यकांत सरगर यांनीच केला आहे. यामुळे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या २०१२ पासूनच्या कामाची सखोल चौकशी करण्याची मागणी अॅड्. मुळीक यांनी केली होती. त्यानुसार रेश्माक्का होर्तीकर यांनी स्वतंत्र अधिकाऱ्यांची नियुक्ती करून रोजगार हमी योजनेतील गैरव्यवहाराची चौकशी करून दोषी अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन अध्यक्षा होर्तीकर यांनी दिले आहे.