जतमध्ये द्राक्ष छाटणीस प्रारंभ
By admin | Published: October 15, 2015 11:17 PM2015-10-15T23:17:30+5:302015-10-16T00:54:13+5:30
मजुरांची टंचाई : मान्सूनच्या हुलकावणीने नुकसान; द्राक्ष बागायतदार चिंतेत
संख : जत तालुक्यामध्ये परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावल्याने पूर्व भागात आॅक्टोबर महिन्यातील द्राक्ष छाटणीस सुरुवात झाली आहे. सर्वत्र द्राक्ष छाटणीची कामे सुरू असल्याने मजुरांची टंचाई निर्माण झाली आहे. मान्सून पावसाने हुलकावणी दिल्याने खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला होता. पावसाअभावी द्राक्ष छाटणीची कामे खोळंबली होती, ती आता सुरू झाली आहेत.
तालुक्यामध्ये ५ हजार ६६० हेक्टर क्षेत्रावर द्राक्षबागा आहेत. प्रतिकूल परिस्थितीत तंत्रज्ञानाचा वापर करीत उजाड माळरानावर बागा उभ्या केल्या आहेत. पाण्याचा काटकसरीने वापर करीत ठिबक बागा उभ्या केल्या आहेत. पाण्याचा काटकसरीने वापर करीत ठिबक सिंचन, मडकी सिंचनाच्या साहाय्याने बागा लावल्या आहेत. तसेच कृषी विभागाच्या अनुदानावर व स्वत: शेततळी बांधली आहेत. पाण्याचा नियोजनबद्ध वापर करून दर्जेदार द्राक्षांचे उत्पादन घेतले जाते. शरद, सोनाक्का, माणिक चमन, सुपर सोनाक्का, थॉमसन आदी जातीच्या बागा आहेत. विहिरीतील काळ्या दगडातील गोड पाणी असल्याने दर्जेदार सुट्या बेदाण्याची निर्मिती केली जात आहे.
उमदी, तिकोंडी, बिळूर, डफळापूर, रामपूर, संख, अंकलगी, भिवर्गी, सिद्धनाथ, जालिहाळ खुर्द, कोंत्यावबोबलाद आदी परिसरात द्राक्षबागांचे क्षेत्र अधिक आहे.
दरवर्षी जुलै महिन्यामध्ये आगाप छाटणी केली जाते. परंतु मान्सूनने हुलकावणी दिल्याने ही छाटणी झालेली नव्हती. परतीच्या पावसाने मात्र हजेरी लावल्याने ओढे, नाले, विहिरींना पाणी आले आहे. पुढील पावसाच्या आशेवर आॅक्टोबर छाटणी सुरू केली आहे. ही द्राक्षे फेब्रुवारी-मार्च महिन्यामध्ये येतात. सध्या छाटणीला सर्वत्र सुरुवात झाली आहे. छाटणी करण्यासाठी मजुरांच्या गँग आहेत. माडग्याळ, अंकलगी, सिद्धनाथ परिसरातील मजूर जीप, टमटममधून त्यांना आणले जात आहेत.
गेल्यावर्षीपेक्षा खते, औषधे, मजुरीच्या दरात वाढ झाली आहे. सध्या बेदाण्याला चांगला दर नसल्याने बेदाणा स्टोअरेजमध्ये ठेवला आहे. स्टोअरेजचे भाडे वगळता पदरात काहीच पडणार नसल्याने द्राक्ष बागायतदारांच्या अडचणीत वाढ झाली आहे. (वार्ताहर)
मजुरीच्या दरात वाढ
द्राक्षबागेतील छाटणी करणे, पेस्ट लावणे, वांझ काढणे, शेंडे खुडणे आदी कामे सुरू आहेत. सर्वत्र कामांची धांदल सुरू असल्याने मजुरांची टंचाई निर्माण झाली आहे. पुरुषाला ३००, स्त्रियांना २५० रुपये मजुरी आहे. बिहारमधील गँगही उपलब्ध आहे. प्रति एकराला २० ते २४ हजार छाटणीपासून ते वांझ, शेंडे खुडण्यापर्यंत अंगावर दिले जात आहे. याचे दर सर्वाधिक असल्यामुळे द्राक्ष बागायदार आर्थिक अडचणीत सापडला आहे. बिहारवरून दरवर्षी द्राक्ष छाटणीसाठी येणारे कर्मचारी निवडणुकीमुळे गावी गेले आहेत. यामुळे येथील मजुरांनी दर वाढविले आहेत.