सिंचन योजना तात्काळ सुरू करा जलव्यवस्थापन समिती : स्वच्छतागृहांसाठी स्वतंत्र ग्रामसभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 01:01 AM2018-09-15T01:01:31+5:302018-09-15T01:02:42+5:30
यंदा जिल्ह्यात सरासरीपेक्षा पाऊस कमी झाल्याने दुष्काळी तालुक्यांमध्ये शेतीसाठी पाणी कमी पडत असल्यामुळे पिके वाया जाण्याचा धोका आहे. जत तालुक्यात तर पिण्याच्या पाण्याचीही टंचाई निर्माण झाली आहे.
सांगली : यंदा जिल्ह्यात सरासरीपेक्षा पाऊस कमी झाल्याने दुष्काळी तालुक्यांमध्ये शेतीसाठी पाणी कमी पडत असल्यामुळे पिके वाया जाण्याचा धोका आहे. जत तालुक्यात तर पिण्याच्या पाण्याचीही टंचाई निर्माण झाली आहे. आठ दिवसात जिल्ह्यातील टेंभू, ताकारी, म्हैसाळ योजना सुरू करण्याची मागणी जिल्हा परिषद जलव्यवस्थापन समितीमध्ये सदस्यांनी केली. योजना तात्काळ सुरु करण्याच्या मागणीचा ठराव करुन शासनाकडे पाठविण्यात येईल, असे आश्वासनही अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी सदस्यांना दिले.
जिल्हा परिषद अध्यक्ष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी जलव्यवस्थापन समितीची सभा झाली. यावेळी उपाध्यक्ष सुहास बाबर, सभापती अरूण राजमाने, ब्रम्हानंद पडळकर, तम्मणगौडा पाटील, सुषमा नायकवडी, चंद्रकांत पाटील, आशाराणी पाटील, स्नेहलता जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत बगाडे आदी उपस्थित होते.
यंदा दुष्काळी पट्ट्यात पाऊस कमी पडला आहे. त्यामुळे भूगर्भातील पाणी पातळी कमी झाली आहे. परिणामी विहिरी, कूपनलिकांना पाणी नाही. हातची पिके वाया जाण्याची भीती आहे. शेतकऱ्यांनी सिंचन योजना सुरु करण्याची मागणी होत आहे. योजना काही दिवस सुरु करून ओढे, नाले, मध्यम प्रकल्प, कालवे, तलाव भरून घेतले, तर शेतीसाठी पाणी कमी पडणार नाही.
सध्या नदीतून वाहून जाणारे पाणी सिंचन योजनांतून वळते करावे, अशी मागणी यावेळी सर्व सदस्यांनी केली. त्यावर संग्रामसिंह देशमुख यांनी, ही मागणी शासनाकडे कळविण्यासाठी जिल्हाधिकारी यांना या बैठकीचा अभिप्राय कळविण्याचे आदेश अधिकाºयांना दिले.
जिल्हा हगणदारीमुक्तीनंतरही अतिरिक्त सर्व्हेमध्ये २४ हजार कुटुंबांची नोंदणी झालेली असल्याची माहिती अधिकाºयांनी दिली. अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी, सर्व्हे करून याशिवाय इतर वंचित कुटुंबे असतील, तर त्यांचाही समावेश स्वच्छ भारत अभियानअंतर्गत स्वच्छतागृहासाठी करण्यात यावा, त्यासाठी अतिक्रमण नियमितीकरणाच्या ग्रामसभेत किंवा स्वतंत्र ग्रामसभेचे आयोजन करून मागणी कळवावी, अशा सूचना पाणी पुरवठा व स्वच्छता विभागास दिल्या.
जिल्ह्यात १५ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर या कालावधित ‘स्वच्छता ही सेवा’ जनजागृती अभियान होत आहे. अभियानाबाबत सर्व अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थितीत यावेळी स्वच्छतेची शपथ देण्यात आली. सावळज येथील मावले टेक आणि पलूस तालुक्यातील घोगाव येथे जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत कोल्हापूर पध्दतीच्या बंधाºयाच्या कामास मंजुरी देण्यात आली.
टंचाईग्रस्त भागात टँकर द्या
जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांनी तालुक्यांकडे टॅँकर मागणी केलेल्या गावांना पाण्याचा पुरवठा करण्यासाठी तहसीलदार यांना अधिकार देण्यात यावेत. टंचाई असल्यामुळे टॅँकरची मागणी होत आहे, मात्र तहसीलदार यांना अधिकारच नसल्याचे सांगितले जाते. हे अधिकार देण्याची मागणी यावेळी जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्याचा निर्णय घेण्यात आला.