इस्लामपूर येथे जयंत करंडक स्पर्धेस प्रारंभ
By admin | Published: February 17, 2017 11:58 PM2017-02-17T23:58:49+5:302017-02-17T23:58:49+5:30
एकांकिकांना चांगला प्रतिसाद : काखी, भक्षक, कस्टमर केअर, सर्जीने पहिला दिवस गाजविला
इस्लामपूर : इस्लामपूर येथे सुरु झालेल्या जयंत करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत काखी, भक्षक, कस्टमर केअर, सर्जी या एकांकिकांनी पहिला दिवस गाजविला. राजारामबापू ज्ञानप्रबोधिनी व अखिल भारतीय नाट्यपरिषदेच्या इस्लामपूर शाखेतर्फे आमदार जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन केले होते. सिनेअभिनेत्री कांचन जाधव यांच्याहस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. राजारामबापू बँकेचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील अध्यक्षस्थानी होते.
या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत ३0 संघांनी सहभाग नोंदवला आहे. शुक्रवारी पहिल्या दिवशी सांगलीच्या राणा प्रताप तरुण मंडळाने ‘काखी’ ही एकांकिका सादर करताना, समाजसेवेच्या नावाखाली स्वत:चा स्वार्थ साधणाऱ्या प्रवृत्तींवर प्रहार केला. तासगावच्या आम्ही कलाकार गु्रपने ‘भक्षक’ एकांकिकेतून वन्यजीवांवर होणारे अतिक्रमण आणि त्यातून उद्भवणारा मनुष्य आणि अन्य प्राण्यांतील संघर्ष चित्रीत केला. आर.आय.टी. राजारामनगरच्या विद्यार्थ्यांनी ‘दो बजनीए’ या एकांकिकेद्वारे स्वातंत्र्यपूर्व काळातील भारत-पाकिस्तान फाळणीची समस्या मांडली. इस्लामपूरच्या माऊली गु्रपने दुष्काळाच्या समस्येवर प्रकाश टाकत जागतिकीकरणाच्या जमान्यात भावना शेअर करण्यासाठी ‘कस्टमर केअर’चा आधार घ्यावा लागतो, हे या एकांकिकेतून उलगडले. भारती विद्यापीठ कोल्हापूरच्या गु्रपने ‘प्रश्नचिन्ह’, तर कऱ्हाडच्या मनोरंजन गु्रपने ‘सर्जी’ या एकांकिकेतून स्त्रियांच्या असुरक्षिततेच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले.
सुनील गुरव- सोलापूर, विश्वास पांगारकर-पुणे, डॉ. सूरज चौगुले- इस्लामपूर परीक्षक म्हणून काम पाहत आहेत. वृषाली आफळे यांनी स्वागत केले. नाट्यपरिषदेच्या अध्यक्षा रोझा किणीकर यांनी प्रास्ताविक केले. डॉ. गोरख मंद्रुपकर यांनी आभार मानले.
यावेळी बाबूराव हुबाले, प्रवीण पाटील, दामाजी मोरे, आर. एस. जाखले, श्रीमती कल्पना कुंभार, प्रा. संदीप पाटील, प्रा. प्रदीप पाटील, डॉ. दीपा देशपांडे, समीर शिकलगार, उज्ज्वला कदम, राजाभाऊ कदम, सचिन कोळी, रवी बावडेकर, प्रा. आशितोष साळुंखे, योगीता माळी, अलका शहा, गौरव मंदु्रपकर, दिग्विजय पाटील, अक्षय कुलकर्णी उपस्थित होते. (वार्ताहर)
इस्लामपूर येथील राजारामबापू नाट्यगृहात जयंत करंडक एकांकिका स्पर्धेचे उद्घाटन सिनेअभिनेत्री कांचन जाधव यांच्याहस्ते झाले. यावेळी रोझा किणीकर, वृषाली आफळे, अलका शहा, दीपा देशपांडे, बाबूराव हुबाले, दामाजी मोरे, प्रा. प्रदीप पाटील उपस्थित होते.