जत पूर्व भागात कोविड सेंटर सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:19 AM2021-04-29T04:19:36+5:302021-04-29T04:19:36+5:30
फोटो ओळ : जत पूर्व भागात कोविड सेंटर सुरु करण्याच्या मागणीचे निवेदन प्रांताधिकारी प्रशांत आवटे यांना तुकारामबाबा महाराज यांनी ...
फोटो ओळ : जत पूर्व भागात कोविड सेंटर सुरु करण्याच्या मागणीचे निवेदन प्रांताधिकारी प्रशांत आवटे यांना तुकारामबाबा महाराज यांनी दिले. यावेळी प्रशांत कांबळे, सोहन धुमाळ, विवेक टेंगले, आदी उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
संख : कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेत, जत पूर्व भागातील संख, माडग्याळ, गुड्डापूर येथे सर्व सोयींनीयुक्त २०० बेडचे कोविड सेंटर सुरु करावे, अशी मागणी चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्रीसंत बागडेबाबा मानवमित्र संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तुकारामबाबा महाराज यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी प्रांताधिकारी प्रशांत आवटे, गटविकास अधिकारी अरविंद धरणगुत्तीकर यांना दिले.
या निवेदनात म्हटले आहे की, तालुक्याच्या ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक आहे. कोरोना रुग्णांना रुग्णालय, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन बेड मिळत नाहीत. त्यासाठी तालुका, जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागत आहे. ही बाब खर्चिक आहे. तालुक्यातील लोकांची परिस्थिती पाहता, स्थानिक ठिकाणी पूर्व भागातील संख, माडग्याळ, गुड्डापूर येथे कोविड सेंटरची गरज आहे. यासाठी आम्ही प्रशासनाला मदत करण्यास तयार आहोत. कोविड सेंटर सुरु केल्यानंतर रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या जेवणाची व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था संघटनेतर्फे करु. या निवेदनाचा विचार करून प्रशासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे.
या निवेदनावर मानवमित्र संघटनेचे प्रशांत कांबळे, सोहन धुमाळ, विवेक टेंगले यांच्या स्वाक्षरी आहेत.