कडेगावसाठी टेंभूच्या आवर्तनास प्रारंभ...
By admin | Published: December 12, 2014 11:26 PM2014-12-12T23:26:57+5:302014-12-12T23:36:56+5:30
कालव्यांद्वारे पाणी : साडेचार हजार हेक्टर क्षेत्राला दिलासा
कडेगाव : टेंभू उपसा सिंचन योजना कडेगाव तालुक्यासाठी रब्बी हंगामातील पहिले आवर्तन सुरू झाले. शिवाजीनगर येथील टप्पा क्रमांक २ चे २ पंप सुरू झाले आहेत. यामुळे सुर्ली आणि कामथी कालव्याद्वारे साडेतीन हजार हेक्टर शेतजमिनीला पाणी मिळणार आहे. याशिवाय मुख्य कालव्याद्वारे हिंगणगाव तलावापर्यंत व त्यापुढे माहुलीपर्यंत १ हजार हेक्टर असे एकंदरीत साडेचार हेक्टर कडेगाव तालुक्यातील लाभक्षेत्राला दिलासा मिळाला.
योजनेचे टेंभू येथील टप्पा क्रमांक १ (अ) चे ९ पंप व टप्पा क्रमांक १ (ब) चे १० पंप असे १९ पंप यापुर्वीच सुरू झाले आहेत. परंतु दुष्काळी सांगोला तालुक्यासाठी मुख्य कालव्याद्वारे पाणी दिले जात होते. कडेगाव तालुक्यातील लाभक्षेत्राला पाणी दिलेले नव्हते. शेतकऱ्यांनी ५० टक्के हून अधिक लाभक्षेत्राचे पाणी मागणी अर्ज दिले व योजनेचे सुर्ली कामथी कालव्याद्वारे आवर्तन सुरू झाले.
टेंभू योजनेच्या सुर्ली कालव्याद्वारे खांबाळे, नेर्ली, अपशिंगे,
कोतवडे, कडेगाव, कडेपूर, हिंगणगाव (खुर्द) आदी गावांच्या लाभक्षेत्राला फायदा होणार आहे. याशिवाय कामथी कालव्याद्वारे शाळगाव, शिवाजीनगर, बोंबळेवाडी, कामथी आदी गावांच्या लाभक्षेत्राला फायदा होणार आहे.
याशिवाय योजनेच्या मुख्य कालव्यातून शिवाजीनगरचा उर्वरित भाग, विहापूर,येडे, हिंगणगाव बुद्रुक परिसराला पाणी मिळणार आहे. रब्बी हंगामात तीन अवर्तन देण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. पूर्ण क्षमतेने कडेगाव तालुक्यास पाणी सोडले आहे. (वार्ताहर)