सांगलीतून लातूर, सोलापूरसाठी रेल्वे गाड्या सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:27 AM2021-01-23T04:27:48+5:302021-01-23T04:27:48+5:30
सांगली : पश्चिम महाराष्ट्रातील मुख्य बाजारपेठ असलेल्या सांगलीतून सोलापूर, लातूर, बंगलुरूपर्यंत एक्स्प्रेस रेल्वे गाड्या सोडण्याची मागणी शुक्रवारी सर्वपक्षीय कृती ...
सांगली : पश्चिम महाराष्ट्रातील मुख्य बाजारपेठ असलेल्या सांगलीतून सोलापूर, लातूर, बंगलुरूपर्यंत एक्स्प्रेस रेल्वे गाड्या सोडण्याची मागणी शुक्रवारी सर्वपक्षीय कृती समितीने मध्य रेल्वे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांच्याकडे केली.
याबाबत कृती समितीचे निमंत्रक सतीश साखळकर म्हणाले की, आशियातील सर्वांत मोठी हळदीची बाजारपेठ सांगलीला आहे तसेच गूळ, द्राक्षे, बेदाणा, सोयाबीन, मक्का आदींसह विविध शेतीमालाचे उत्पादन जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात होते. सांगलीची बाजार समितीही रेल्वे स्थानकाजवळच आहे. त्यामुळे सांगली रेल्वे स्थानकातून राज्यातील इतर शहरालांना जोडणारी रेल्वेगाड्या सुरू झाल्यास त्याचा फायदा शेतकऱ्यांसह नागरिकांना होईल.
सोलापूर एक्स्प्रेस, नांदेड एक्स्प्रेस, गुलबर्गा एक्सप्रेस या गाड्या सांगलीतून सोडाव्यात, तसेच बेंगलुरू ते बेळगाव ही एक्स्प्रेस गाडी बेळगावात १४ तास थांबून असते. ती गाडी सांगलीपर्यंत आणावी. सांगली ते कोल्हापूरसाठी तीन लोकल रेल्वे, पंढरपूरसाठी दिवसातून दोन गाड्या साोडण्याची मागणी केली आहे. कुर्डुवाडी-मिरज डेमू प्रवासी गाडी, परळी वैजनाथ-मिरज एक्स्प्रेस, बेळगाव-मिरज पॅसेंजर, लोंढा-मिरज पॅसेंजर, कॅसलरॉक-मिरज पॅसेंजर, कोल्हापूर-मिरज डेमू या गाड्याचा थांबा विश्रामबाग रेल्वे स्थानकावर करण्यात यावा, अशी मागणीही महाव्यवस्थापकांकडे करण्यात आली आहे.