अंदाजपत्रकीय सभेचा राजकीय आखाडा
By admin | Published: July 21, 2014 11:55 PM2014-07-21T23:55:24+5:302014-07-21T23:55:24+5:30
विधानसभेचे पडसाद : प्रचंड गदारोळात अंदाजपत्रक मंजूर, नागरी समस्यांवरील चर्चेऐवजी राजकीय टीका..
.सांगली : महापालिकेच्या अंदाजपत्रकीय चर्चेवेळी सत्ताधारी आणि विरोधकांत जोरदार खडाजंगी झाली. नागरी समस्यांऐवजी राजकीय टीकाटिपणी, एकमेकांची उणीदुणी काढल्यामुळे सभेत प्रचंड गदारोळ झाला. या गदारोळातच काँग्रेसने अंदाजपत्रक मंजूर करीत सभा संपविली. याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी व स्वाभिमानी आघाडीने सभागृहात फलक झळकावून सत्ताधाऱ्यांनी पळ काढल्याचा आरोप केला. विधानसभा निवडणुकीचेच पडसाद सभागृहात उमटत होते.
गेल्या आठवड्यात स्थायी समिती सभापती राजेश नाईक यांनी ५४२.१४ कोटींचे अंदाजपत्रक महासभेला सादर केले. सदस्यांच्या अभ्यासासाठी सभा तहकूब करण्यात आली. आज, सोमवारी महापौर कांचन कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली अंदाजपत्रकीय चर्चेला सुरुवात झाली. काँग्रेसचे शेखर माने यांनी, वीज निर्मिती कंपनीला कचरा विकल्यास सात कोटीचे उत्पन्न पालिकेला मिळू शकते, तसेच शासनाच्या विविध योजनांसाठी पालिकेच्या हिश्श्यापोटीची रक्कम कर्जरोख्यातून उभी करावी, बुरूड समाजासाठी स्मशानभूमी विकसित करावी, अशा सूचना केल्या. अनारकली कुरणे, रोहिणी पाटील, संतोष पाटील या सदस्यांनी, अंदाजपत्रक वास्तववादी असल्याचा दावा केला. विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी यांनी, एकूण उत्पन्नाच्या ५१ टक्के एलबीटीचा आहे. यंदाच्या अंदाजपत्रकात १२६ कोटींचे उद्दिष्ट दिले आहे. ते कसे वसूल करणार?, असा प्रश्न केला. संजय बजाज यांनी, एलबीटीबाबत शासनाचे धोरण ठरलेले नाही. त्यामुळे प्रशासन जकात वसूल करणार की एलबीटी? असा सवाल केला. गौतम पवार यांनी, सध्या नागरिकांच्या करातून मिळणाऱ्या पैशांवरच पालिकेचे कामकाज सुरू आहे. गेल्या १६ वर्षात उत्पन्नाची साधने शोधलेली नाहीत. जनतेच्या हितासाठी अंदाजपत्रकात कोणतीच तरतूद नाही. वसंतदादांनी जिल्ह्याचा विकास केला, सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या समाधीस्थळी जाऊन चिंतन करावे, असा टोला लगाविला. विष्णू माने यांनी, एलबीटीबाबत दिशाभूल केली जात आहे. यंदाचे अंदाजपत्रक विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केले असून, सत्ताधाऱ्यांनी शहराची वाट लावल्याचा आरोप केला. स्वरदा केळकर म्हणाल्या की, अंदाजपत्रकात महिलांसाठी विशेष तरतूद नाही. केवळ सुशोभिकरणावर भर दिला आहे. संगीत कारंजे, पादचारी पूल करण्यापेक्षा रस्त्यातील खड्डे बुजवून नागरिकांना मूलभूत सुविधा द्या, अशी मागणी त्यांनी केली.
चर्चेला उत्तर देताना सभापती नाईक म्हणाले, ६० कोटी कामांच्या निविदा मंजूर केल्या आहेत. अत्याधुनिक दूरध्वनी सेवा, पाण्याच्या पाईपलाईनसाठी खड्डे पडले आहेत. ते मुजविले जातील. त्याचे काम सुरू आहे. एलबीटीची २०० कोटींपर्यंत वसुली जाऊ शकते. मुख्यमंत्री काँग्रेसचे असले तरी अर्थ खाते राष्ट्रवादीकडे आहे. त्यासाठी सर्वच सदस्यांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटून एलबीटीचे धोरण काय आहे, हे जाणून घेऊया, असे आवाहन केले.
संतोष पाटील यांनी महाआघाडीवर हल्ला चढविला. ते म्हणाले की, महाआघाडीने प्रतापसिंह उद्यानाकडे दुर्लक्ष केले; पण आता उद्यानासाठी एक कोटीचा निधी मंजूर झाला आहे.
सांगलीच्या आमदारांनी राष्ट्रीय महामार्गासाठी प्रयत्न केले नाहीत. त्यामुळेच मोठे उद्योग सांगलीत आले नाहीत, असे वक्तव्य करताच सभेत गोंधळ उडाला. राष्ट्रवादीचे संजय बजाज यांनी आमराई व महावीर उद्यानांचा दाखला दिला. शहरात खड्डे पडले आहेत, ते आधी मुजवा, असा टोला मारला. गौतम पवार यांनी रत्नागिरी-नागपूर महामार्ग मंजूर झाल्याचे सांगितले.
गटनेते किशोर जामदार यांनी राजकीय टीका-टिपणी न करता सदस्यांनी सूचना मांडव्यात, असे दोनदा आवाहन केले. मैनुद्दीन बागवान यांनी महाआघाडीचा कारभार पारदर्शी होता. ६० कोटींतील २० कोटींचा निधी महाआघाडीच्या काळात आलेला आहे. ड्रेनेज, पाणी योजना आम्ही मंजूर केली. पाणी योजनेचे १४ कोटी येऊनही टक्केवारीसाठी निविदाही काँग्रेसला काढता आलेल्या नव्हत्या. लोकसभेला काय घडले, हे साऱ्यांनाच माहीत आहे, आता विधानसभेवेळीही तेच घडणार आहे, असा टोला लगाविला. यावरून सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. काँग्रेसचे सर्व सदस्य आक्रमक झाले. त्यातच महापौर कांचन कांबळे यांनी अंदाजपत्रक मंजूर करून सभा संपल्याचे जाहीर केले. त्यानंतर पुन्हा गोंधळ सुरू झाला. राष्ट्रवादी व स्वाभिमानी आघाडीच्या नगरसेवकांनी एकत्र येत काँग्रेसच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. सभागृहात ‘आमदनी आठन्नी, खर्च्या रुपया’ असा डिजिटल फलकही राष्ट्रवादीच्या सदस्यांनी फडकविला. आम्हाला अजून अंदाजपत्रकावर चर्चा करायची, असे म्हणत सत्ताधाऱ्यांनी पळ काढल्याचा आरोप केला.
सभेत बहुतांश सदस्यांनी अंदाजपत्रकावर सूचना न करता विधानसभा निवडणुकीचा संदर्भ देत राजकीय भाषणबाजीच अधिक केली. आपआपल्या नेत्यांचे गुणगान करण्यातच सत्ताधारी आणि विरोधक मश्गुल होते. (प्रतिनिधी)
शासनाने एलबीटीचा खेळखंडोबा केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेमुळे करप्रणाली विस्कळीत होऊन शहराची दुरवस्था झाली आहे. सत्ताधाऱ्यांनीही उत्पन्नाची साधने शोधलेली नाहीत. केवळ मागचा ताळेबंद पुढे नेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे या अंदाजपत्रकाला स्वाभिमानीचा विरोध आहे. किशोर जामदार व राजेश नाईक यांनीही राजकीय घोषणा करून सभेत गोंधळ घातला. त्यांनी सभेतून पळ काढला
- गौतम पवार, स्वाभिमानी आघाडी
महापालिकेचे अंदाजपत्रक तयार करताना प्रामाणिक भावना होती. महाआघाडीच्या काळातही पावणेचारशे कोटींची अंदाजपत्रके सादर केली आहेत. विरोधकांनी अंदाजपत्रकावर सूचना करण्याऐवजी केवळ राजकीय टीकाटिपणी सुरू केली. आगामी विधानसभेसाठी काँग्रेसला फिलगुड वातावरण आहे. ते दूषित करण्यासाठीच सभेत विरोधकांनी गोंधळ घातला. ही बाब दुर्दैवी आहे.
- राजेश नाईक, सभापती,
स्थायी समिती