क्षारपड जमिनीत राजकीय मशागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2018 11:34 PM2018-04-08T23:34:38+5:302018-04-08T23:34:38+5:30

State farming in alkaloid soil | क्षारपड जमिनीत राजकीय मशागत

क्षारपड जमिनीत राजकीय मशागत

Next

अशोक पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : कृष्णा-वारणा या दोन्ही नद्यांच्या कुशीत वसलेल्या व बारमाही पाण्याने बहरलेल्या वाळवा तालुक्यातील शेतीला क्षारपडच्या प्रश्नाने ग्रासले आहे. क्षारपड जमीन सुधारणेची मोहीम हाती घेत आमदार जयंत पाटील, राजू शेट्टी यांची संमिश्र मात्रा तालुक्यात लागू झाली असली तरी राजकीय मशागत म्हणून या मोहिमेकडे पाहिले जात आहे. त्यामुळे रयत क्रांतीच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे.
आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार राजू शेट्टी, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि आमदार जयंत पाटील यांच्यामध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. भाजप सरकारच्या माध्यमातून मंत्री खोत यांनी तालुक्यातील विविध विकास कामांसाठी निधी उपलब्ध करुन राष्ट्रवादी आणि स्वाभिमानीला नमविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. यामुळेच इस्लामपूर शहरात झालेल्या हल्लाबोल यात्रेच्या सभेत बहुतांशी नेत्यांनी सदाभाऊ खोत यांनाच टार्गेट केले होते, तर खासदार शेट्टी यांनी मंत्री खोत यांना विरोध करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला जवळ केले आहे.
दोनच दिवसांपूर्वी राजू शेट्टी यांनी बहे (ता. वाळवा) येथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन क्षारपड जमिनीच्या प्रश्नावर बैठक घेतली. त्यावेळी तांबवे येथील राष्ट्रवादीचे माजी जि. प. उपाध्यक्ष व कृष्णा कारखान्याचे उपाध्यक्ष लिंबाजी पाटील यांच्यासह नेर्ले, तांबवे, काळमवाडी, बहे या परिसरातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीत क्षारपड जमिनी पुन्हा वापरायोग्य करण्यासाठी नेमकी काय उपाययोजना करावी, याबाबत मंथन झाले. केंद्र शासनाच्या जलनिस्सारण योजनेच्या माध्यमातून जमिनीत येणारे अतिरिक्त पाणी पाईपलाईनच्या माध्यमातून बाहेर काढण्याची योजना अस्तित्वात आहे.
यासाठी शेतकऱ्यांना ४0 टक्के रक्कम भरावी लागणार आहे. तसेच केंद्र शासन ६0 टक्के निधी देणार आहे. ४0 टक्के शेतकºयांची रक्कम ही साखर कारखान्यांनी भरण्याबाबतही या बैठकीत चर्चा झाली.
या बैठकीची माहिती रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांना लागली. त्याची माहिती तात्काळ कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आली. त्यामुळे ‘ताकाला जाऊन मोगा का लपवायचा’ अशी मार्मिक टिपणी करुन खोत यांनी याला जादा महत्त्व दिले नाही.
खेळी स्पष्ट : सदाभाऊंना शह
काळमवाडी येथील निघालेला ओढा सध्या पूर्णपणे बुजला आहे. या ओढ्याचा प्रवास काळमवाडी, नेर्ले, येवलेवाडी, तांबवे असा आहे. हे पाणी बहे तीळगंगा नदीला मिळते. हा पाण्याचा प्रवास कित्येक वर्षापासून बंद आहे. त्यामुळे हे पाणी परिसरातील जमिनींमध्ये मुरते. त्यामुळे हजारो एकर क्षेत्र क्षारपड बनले आहे. याच जमिनीच्या उपाययोजनेसाठी खासदार शेट्टी यांनी बहे येथे तातडीने बैठक घेतली. आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच त्यांनी या बैठकीचे नियोजन केले होते. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना शह देण्यासाठीच शेट्टींची खेळी असल्याचे जाणवत होते.
गुलाल तिकडं चांगभलं..!
कृष्णा कारखान्यात वाळवा तालुक्यातील राष्ट्रवादी, काँग्रेस व महाडिक गटाचे मिळून १0 संचालक आहेत. या संचालकांना कृष्णा कारखान्यावर गेले की भाजपचा झेंडा नाचवावा लागतो. राष्ट्रवादीचे ८ संचालक आहेत, तर काँग्रेसचे जितेंद्र पाटील आणि महाडिक गटाचे गिरीश पाटील हेही वाळवा तालुक्यातीलच आहेत. त्यांनाही कृष्णा कारखाना व तालुक्यात वेगवेगळी भूमिका राबवावी लागते. आता स्वाभिमानीला राष्ट्रवादीने जवळ केल्याने त्यांची स्थिती ‘गुलाल तिकडं चांगभलं’, अशीच आहे.

Web Title: State farming in alkaloid soil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली